मेट्रोच्या अॅक्वा लाईनचे डिसेंबर १८ ते २० दरम्यान उद्घाटन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:04 AM2019-12-14T00:04:25+5:302019-12-14T00:06:38+5:30
मेट्रो रेल्वेची अॅक्वा लाईन अर्थात सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंतच्या रिच-३ लाईनचे उद्घाटन डिसेंबर १८ ते २० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो रेल्वेची अॅक्वा लाईन अर्थात सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंतच्या रिच-३ लाईनचे उद्घाटन डिसेंबर १८ ते २० दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी स्थानिक खासदार म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाविकास आघाडी सरकारचे सर्व मंत्री हजर राहणार असल्याची माहिती आहे. उद्घाटनाच्या तयारीसाठी मेट्रोचे अधिकारी रात्रंदिवस काम करीत आहेत. तारीख आणि वेळ लवकरच निश्चित होणार असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शुक्रवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी झाशी राणी मेट्रो स्टेशनची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री १६ ते २१ डिसेंबरपर्यंत नागपुरात असून त्यांच्या हस्ते अॅक्वा लाईनचे उद्घाटन करण्याचा महामेट्रो प्रशासनाचा मानस आहे. रिच-३ मार्गावर लोकमान्यनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, झाशी राणी आणि सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन प्रवाशांसाठी तयार आहेत.
यापूर्वी अॅक्वा लाईनचे उद्घाटन ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण हवामान खात्याने त्या दिवशी वादळी पावसाचा इशारा दिल्यानंतर पीएमओ कार्यालयाने पंतप्रधानांचा दौरा रद्द केला होता. पंतप्रधानांनी मेट्रोच्या वर्धा मार्गाप्रमाणेच व्हिडिओ कॉन्फरसिंगने अॅक्वा मार्गाचे उद्घाटन करण्याची तयारी दर्शविली होती. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांकडे नागपुरात येऊन उद्घाटन करण्याची विनंती केली होती. पण मध्यंतरी निवडणुकांमुळे त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. आता महामेट्रो प्रशासनाने नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्घाटनाचे निमंत्रण दिल्याची माहिती आहे.
अॅक्वा लाईनच्या उद्घाटनानंतर हिंगणा भागातून सीताबर्डी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे. उद्घाटनानंतर मेट्रोचे रिच-१ वर्धा मार्ग आणि नव्याने रिच-३ हिंगणा हे दोन मार्ग प्रवाशांसाठी खुले होणार आहे. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर मेट्रोच्या महसुलात वाढ होईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अॅक्वा लाईनवरील लोकमान्यनगर स्टेशनवरून मेट्रोने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवक-युवतींची संख्या वाढणार आहे.