नागपूर जिल्ह्यात नव्या मोबाईल शॉपीचे चोरानेच केले 'उद्घाटन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 08:14 PM2018-01-19T20:14:56+5:302018-01-19T20:19:31+5:30
दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी दिवसा उद्घाटन झालेल्या दुकानावर नजर ठेवली. रात्रीच्या वेळी त्या मोबाईल शॉपीचे मागील बाजूचे दार तोडून प्रवेश केला आणि तेथून तब्बल १४,६५० रुपयांचे मोबाईल हॅन्डसेटसह इतर साहित्य लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोबाईलने भल्या-भल्यांना वेड लावले आहे. त्यातच बालकांमध्ये मोबाईलची वेगळीच ‘क्रेझ’ आहे. त्यातूनच दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी दिवसा उद्घाटन झालेल्या दुकानावर नजर ठेवली. रात्रीच्या वेळी त्या मोबाईल शॉपीचे मागील बाजूचे दार तोडून प्रवेश केला आणि तेथून तब्बल १४,६५० रुपयांचे मोबाईल हॅन्डसेटसह इतर साहित्य लंपास केले. मात्र हेच मोबाईल आणि साहित्य विकत असताना ‘ते’ दोघेही पकडले गेले. चोरीचा हा प्रकार भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि. १८) मध्यरात्रीनंतर १.३० वाजताच्या सुमारास घडला.
आवेश अलीम पटेल शेख (२३, रा. भिवापूर) असे फिर्यादीचे नाव आहे. बसस्थानकालगत त्याने मोबाईल शॉपी सुरू केले. या दुकानाचे उद्घाटन गुरुवारी झाले. दरम्यान भिवापुरातीलच १३ आणि १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकांची नजर या दुकानातील मोबाईलवर पडली. त्यातूनच त्यांनी चोरी करण्याचा बेत आखला. यासाठी दुकानाचा चौफेर फटका मारला. सायंकाळच्या वेळी त्या दोघांचेही पालक शहरातीलच एका वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तीच संधी साधून ते दोघेही घराबाहेर निघाले. रात्री १.३० वाजताच्या सुमारास या दोघांनीही दुकानाचे मागील दार लोखंडी सळाकीने उघडून आत प्रवेश केला. दुकानातील मोबाईल हॅन्डसेटसह मोबाईल बॅटरी, चार्जर आदी एकूण १४,६५० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आवेश गेला असता त्याला चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबत त्याने भिवापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तपासाअंती चोरीचा पर्दाफाश झाला. पुढील तपास ठाणेदार हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक दौलत नैताम, दीपक जाधव करीत आहे.
मोबाईल विक्रीमुळे पकडले गेले
या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान मोबाईल आणि इतर साहित्य विकण्यासाठी दोन विधिसंघर्षग्रस्त बालक फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून मोबाईल हॅन्डसेट, मोबाईल बॅटरी, चार्जर, हेडफोन, ब्ल्यूटूथ स्पिकर, सीपीयू केबल असा १४,६५० रुपयांच्या मुद्देमालासह लोखंडी सळाक जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८०, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून दोन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत नागपुरातील बाल न्यायालयापुढे हजर केले.