पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर विभागातील ३६ आरयूबीचे लोकार्पण; २६ फेब्रुवारीचा मुहूर्त
By नरेश डोंगरे | Updated: February 22, 2024 13:03 IST2024-02-22T13:02:36+5:302024-02-22T13:03:38+5:30
देशभरातील विविध रेल्वे स्थानकांच्या विकास कामांची पायाभरणी, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने २६ फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ आरयूबींच्या लोकार्पणाचाही त्यात समावेश आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर विभागातील ३६ आरयूबीचे लोकार्पण; २६ फेब्रुवारीचा मुहूर्त
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ रोड अंडर ब्रीजेस (आरयूबी)चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे. विदर्भासह मध्य प्रदेशातील आरयूबीचाही त्यात समावेश आहे.
देशातील १५०० आरओबी (रोड ओव्हर ब्रीज) आणि अंडर ब्रीजचे उद्घाटन / लोकार्पण तसेच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत ५५४ रेल्वे स्थानकांवरील विकास कामांची पायाभरणी करण्याचे ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने २६ फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील ३६ आरयूबींच्या लोकार्पणाचाही त्यात समावेश आहे. हे सर्व पूल आमला-छिंदवाडा, आमला-ईटारसी, आमला-नागपूर, नागपूर - वर्धा, वर्धा - धामनगाव, नरखेड-अमरावती आणि सेवाग्राम - बल्लारशाह मार्गावर आहेत.
क्रॉसिंग गेट काढले जाणार
आरओबी आणि आरयूबी निर्माण करण्यात आल्यामुळे अनेक फायदे होणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, यामुळे जागोजागी अडथळ्यासारखे असलेले रेल्वे क्रॉसिंग गेट काढले जाणार असल्याने वाहने आणि रेल्वे गाड्यांमधील अपघाताचा धोका कमी होईल. वारंवार जागोजागच्या नागरिकांना, वाहनधारकांना क्रॉसिंग गेटवर रेल्वे गाडी जाण्याची वाट पहात ताटकळत राहावे लागते. अनेकदा रुग्णवाहिका अडकून पडतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप होतो. तो यामुळे होणार नाही. नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वेळ वाचेल. सोबतच क्रॉसिंग गेटजवळ रेल्वे गाड्यांचा वेग कमी करावा लागतो. त्यामुळे गाडी विलंबाने पोहचण्याची शक्यता असते, तेदेखिल यामुळे होणार नाही.
प्रदुषण कमी होईल
रेल्वे क्रॉसिंग गेटमुळे दिवसरात्र वारंवार अनेक वाहने गेटवर अडकून पडतात. लवकरच गाडी येईल, या अपेक्षेत अनेक चालक आपले वाहन सुरूच ठेवतात. त्यामुळे नाहक पेट्रोल, डिझेल जळते आणि त्यामुळे परिसरातील वातावरण प्रदुषित होते. क्रॉसिंग गेटचा अडथळा दूर होणार असल्याने प्रदुषणाचा धोका निकाली निघेल आणि संबंधित वाहन धारकांच्या पेट्रोल, डिझेलची बचत होऊन त्यांना ईच्छित ठिकाणी पोहचण्यास मदत होईल.