नाना पाटेकरांचा ‘पुरुष’ रंगमंचावर पुन्हा साकारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2022 11:13 AM2022-12-03T11:13:34+5:302022-12-03T11:26:06+5:30
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन : ‘माँ भारती की यशोगाथा : वंदे मातरम्’मधून उजळला क्रांतिनायकांचा इतिहास
नागपूर : एवढा मोठ्ठा रंगमंच दिसल्यावर बिनधास्त बागडण्याची भावना माझ्या मनात निर्माण झाली असून, एका कलावंतांचा खरा सूर्य रंगमंचावरचे दिवेच असतात आणि बॅकस्टेजवरील अंधार हा त्याचा सुख असतो. या रंगमंचामुळे मला माझे ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा करावेसे वाटत आहे. रंगमंचावर उभा झाल्यामुळे मला इथे पाहुणा म्हणून उभा राहण्यापेक्षा कलावंत म्हणून उभा राहण्याची इच्छा संचारली असून, पुढच्या महोत्सवात कलावंत म्हणूनच मी इथे येणार... अशी सुखद भावना नाना पाटेकर यांनी यावेळी व्यक्त केली.
शुक्रवारी क्रीडा चौक, हनुमाननगर येथील ईश्वर देशमुख शारीरीक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा रंगला. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध सदाबहार अभिनेता व समाजसेवक नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते आपल्या भावनांना वाट मोकळी करत होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी, राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, आ. प्रवीण दटके, गिरीश गांधी, संजय भेंडे, उपेंद्र कोठेकर, अनिल सोले, गौरशंकर पराशर, मधुप पाण्डेय आदी उपस्थित होते.
या एका रंगमंचावर विविध वाद्य, गायन, नृत्य आदींचे सूर मिळू शकतात तर आपणा सर्वांचे सूर का मिळू शकत नाही, असा सवाल उपस्थित करतानाच मनोरंजन हा माणसाचा स्थायिभाव आहे आणि मनोरंजनाने सर्वस्पर्शी होता येते, ही भावना दृढ होते. यशवंतराव चव्हाण हे कायम लेखक, कवी, कलावंतांच्या गराड्यात राहत होते आणि सर्वस्पर्शी होण्याची भावनाच त्यामागे होती, असेही पाटेकर यावेळी म्हणाले. यावेळी ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आभासी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. यानंतर १२०० नागपूरकर कलावंतांचा सहभाग असलेला संगीतकार शैलेश दाणी व बासरी वादक अरविंद उपाध्ये यांची संकल्पना असलेला ‘माँ भारती की यशोगाथा : वंदे मातरम’ हा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर आधारिक संगीत कार्यक्रम सादर झाला. याद्वारे देशातील क्रांतिनायकांचा जयजयकार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले तर आभार बाळ कुळकर्णी यांनी मानले.
‘विक्रम’सारखा नट होणे नाही
- ‘नटसम्राट’ची आठवण काढताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना नाना पाटेकर यांनी श्रद्धांजली वाहिली. विक्रमसारखा नट होणे नाही आणि जगातील पहिल्या १० कलावंतांमध्ये विक्रमचा समावेश होतो, अशी भावना पाटेकर यांनी व्यक्त केली.
१२०० कलावंतांचा एकसाथ वंदे मातरम्
शुक्रवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवात 'माँ भारती की यशोगाथा : वंदे मातरम’ या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. नागपुरातील १२०० कलावंतांनी एकसाथ सादर केलेल्या या कार्यक्रमात देशाच्या जडणघडणीमध्ये ज्या महापुरुषांचे, ज्या क्रांतिनायकांचे योगदान राहिले. त्यांचा आढावा घेण्यात आला.