रामझुला वाय आकार व नवीन लोहा पुलाचे आज लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 08:00 AM2023-04-01T08:00:00+5:302023-04-01T08:00:06+5:30
Nagpur News रामझुला ते एलआयसी चौक आणि संविधान चौकापर्यंतच्या वाय आकाराचा उड्डाणपूल आणि रामझुल्याजवळ नवीन लोहापूल आरयूबीचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
नागपूर : रामझुला ते एलआयसी चौक आणि संविधान चौकापर्यंतच्या वाय आकाराचा उड्डाणपूल आणि रामझुल्याजवळ नवीन लोहापूल आरयूबीचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. या दोन्ही पुलांचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. हे दोन्ही प्रकल्प महामेट्रोने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या केंद्रीय रस्ते निधीतून केले आहेत.
नवीन लोहापूल (आरयूबी)मुळे मानस चौक ते कॉटन मार्केटदरम्यानची वाहतूक समस्या कमी होण्यास मदत होईल. दुसरीकडे, वाय आकाराचा पूल रामझुल्यापासून सुरू होतो आणि श्री मोहिनी कॉम्प्लेक्सजवळ दोन भागांत आरबीआय चौक आणि एलआयसी चौकाकडे जातो.
वाहतूक व्यवस्था अशी असेल...
वाय आकाराच्या उड्डाणपुलावर एकेरी वाहतूक असेल. रामझुला येथून वाहने आरबीआय, एलआयसीकडे जाऊ शकतील. सेंट्रल एव्हेन्यूवरून येणाऱ्यांना श्री मोहिनी कॉम्प्लेक्समधून आरबीआयकडे वळसा घालून थेट एलआयसी चौकाकडे जावे लागेल. आरबीआय, एलआयसी चौकातून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना रामझुला वापरता येणार नाही. त्यांना उपलब्ध मार्गावरून जावे लागेल आणि जयस्तंभ चौकातून उजवे वळण घेऊन रेल्वेस्थानकाकडे जावे लागेल. सेंट्रल एव्हेन्यूवरून येणाऱ्या आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्यांना रामझुल्याच्या डाव्या बाजूने रेल्वेस्थानकाच्या दिशेने जावे लागेल. तसेच नवीन लोहापूल आरयूबीच्या बाबतीत कॉटन मार्केट चौकातून मानस चौकापर्यंत जुन्या लोखंडी पुलावरून वाहनांची ये-जा करण्यात येणार आहे. नवीन लोहापूल आरयूबीमार्गे मानस चौकातून कॉटन मार्केट चौकाकडे वाहने जातील.