शतक महोत्सवी वर्षात आदिवासी अध्यासन केंद्राची मुहूर्तमेढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 10:19 AM2022-04-21T10:19:46+5:302022-04-21T10:23:31+5:30
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी आदिवासी कला, संस्कृती आणि साहित्याचा अभ्यास होण्यासाठी नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शहा अध्यासन केंद्र निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ऑगस्ट महिन्यात शंभराव्या वर्षात पदार्पण करीत असून, शतक महोत्सवी वर्षात विविध उपक्रम सुरू करण्यासाठी १०७ कोटी रुपयाच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील गरजा, संधी तसेच भविष्यातील विकासाच्या शक्यतेचा वेध घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शतक महोत्सवी वर्षात आदिवासी अध्यासन केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्याचा विद्यापीठाचा मानस असून, त्यादृष्टीने या प्रस्तावाच्या मान्यतेकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी वर्षात विविध उपक्रम, परिषदा, मेळावे घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी विशेष समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या वर्षासाठी राज्य शासनाकडे १०० कोटी रुपयाची मागणी करण्याचे ठरविण्यात आले. त्यासंबंधात प्राधिकरण सदस्यांनी प्रस्तावदेखील तयार केला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य व विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांनी शासनदरबारी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. त्यांनी पुढाकार घेऊन कुलगुरूंसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली व १०७ कोटींचा निधी का आवश्यक आहे, याचे सादरीकरण केले.
गोंड राजे बख्त बुलंद शहा आदिवासी अध्यासन केंद्र, आदिवासी विद्यार्थिनींकरिता १०० निवास क्षमता असलेले वसतिगृह यासाठी १३ कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. विद्यापीठाने आदिवासी अध्यासन केंद्रासाठी घेतलेल्या पुढाकाराचे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने स्वागत केले आहे. यासोबतच टेक्नॉलॉजी व ऊर्जा पार्क, तांत्रिक कौशल्य विकास केंद्र, क्रीडा संकुल, इतिहास व वारसा संग्रहालय या गोष्टीदेखील विद्यापीठात संशोधन, तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी मैलाचा दगड ठरतील. पावसाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्याची विनंती आम्ही उपमुख्यमंत्र्यांना केली आहे. नागपूर विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास लक्षात घेता निश्चित सरकार प्रस्ताव मान्य करेल, असा विश्वास असल्याचे वंजारी यांनी सांगितले.
मंत्र्यांची प्रस्तावाला अनुकूलता
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी आदिवासी कला, संस्कृती आणि साहित्याचा अभ्यास होण्यासाठी नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शहा अध्यासन केंद्र निर्मितीचा प्रस्ताव सादर केला होता. विद्यापीठाच्या शताब्दी वर्षात या केंद्राची सुरुवात झाली तर ती ऐतिहासिक बाब ठरेल. उच्चशिक्षण मंत्र्यांनी विद्यापीठाच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती विद्यापीठ शताब्दी महोत्सव समिती सदस्य दिनेश शेराम यांनी दिली.