नागपुरात नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:33 PM2019-01-31T23:33:55+5:302019-01-31T23:35:14+5:30
२२ फेब्रुवारीपासून उपराजधानीत होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रेशीमबाग मैदानासमोरील कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. नाट्य संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटन केले. शहरातील रंगकर्मी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २२ फेब्रुवारीपासून उपराजधानीत होऊ घातलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या रेशीमबाग मैदानासमोरील कार्यालयाचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले. नाट्य संमेलन आयोजन समितीचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी नारळ फोडून कार्यालयाचे उद्घाटन केले. शहरातील रंगकर्मी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, समितीचे संयोजक व मनपाचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी, समन्वयक प्रवीण दटके, मनपातील विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, शेखर सावरबांधे, अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे, ज्येष्ठ रंगकर्मी बापू चनाखेकर यांच्यासह अनिल कुळकर्णी, संजय पेंडसे, नरेंद्र शिंदे, राजेश चिटणीस, संजय जीवने, विदर्भ साहित्य संघाचे दिलीप म्हैसाळकर, रवींद्र दुरुगकर, श्याम पेठकर, नंदू कव्हाळकर, बळवंत येरपुडे, किशोर आयलवार, सोमेश्वर बालपांडे, कीर्तीद राईकर, अभय देशमुख, स्नेहल कुचनकर, मुकुंद वसुले, विनोद राऊत, प्रदीप धरमठोक, रुपाली कोंडेवार आदींसह मोठ्या संख्येने नाट्य कलावंत व कला, साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना गिरीश गांधी म्हणाले, पुण्या-मुंबईला मोठे सांस्कृतिक कार्यक्रम होताना सर्वपक्षीय नेत्यांचा एकत्रित सहभाग दिसून येतो. आतापर्यंत नागपुरात ही उणीव होती. मात्र नाट्य संमेलनाच्या आयोजन समितीमधील सदस्यांमुळे सर्वपक्षीय सहयोगाची वातावरणनिर्मिती झाली आहे. संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी हे वातावरण असेच राहावे, अशी सदिच्छा त्यांनी दिली. प्रफुल्ल फरकासे यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, नाट्य संमेलनाच्या नोंदणीला सुरुवात झाली असून, दोन विदेशी नाट्य संस्थांनी नोंदणी केली आहे. मराठी नाट्यरसिक सर्वत्र पसरले असून, सर्वांना संमेलनाबाबत उत्सुकता आहे. संमेलनासाठी चार ते साडेचार कोटींचा खर्च येणार असून, हा शिवधनुष्य पेलण्यासाठी सर्वांचा हातभार लागण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. संचालन अ.भा. नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर यांनी केले. स्वागत समितीचे सचिव संजय भाकरे यांनी आभार मानले.
रंगकर्मी व सदस्यांची नोंदणी सुरू
कार्यालयाच्या उद्घाटनासह रंगकर्मींची तसेच संमेलनाच्या नियोजनासाठी विविध समित्यांवर सदस्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी फॉर्म तयार केला असून ते कार्यालयात उपलब्ध राहणार आहेत. नियोजन आणि कार्यक्रमांच्या आखणीसाठी आयोजन समितीची बैठक होणार असल्याची माहिती नरेश गडेकर यांनी दिली.
५ पासून महापौर करंडक एकांकिका
नाट्य संमेलनाच्या पूर्वरंगअंतर्गत येत्या ५ फेब्रुवारीला महापौर करंडक एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येणार आहे. ही फेरी केवळ शहरातील एकांकिकांसाठी असेल. यानंतर १३ ते १९ फेब्रुवारीदरम्यान स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून यामध्ये राज्यभरातील विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन नाटकांचा सहभाग राहणार असल्याचेही गडेकर यांनी स्पष्ट केले.