अंधेरी पुलाची घटना अत्यंत दुर्दैवी; धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:40 PM2018-07-03T12:40:04+5:302018-07-03T12:40:31+5:30
मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभुत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मंगळावारी नागपुरात केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभुत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मंगळावारी नागपुरात केला आहे.
अंधेरीतील पादचारी गोखले पुल कोसळल्यानंतर रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या एकंदरीत कारभारावर राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
अंधेरी स्थानकाचा पादचारी पूल कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे असे सांगतानाच धनंजय मुंडे यांनी मुंबईतून कोट्यवधी रुपयांचा कर रुपात निधी मिळत असताना मुंबईकरांच्या मुलभुत सुविधांकडे का लक्ष दिले जात नाही असा सवाल सरकारला केला आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे अपघातांच्या घटना वारंवार घडत असताना तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यापेक्षा एकदाच उपनगरीय रेल्वेचा सर्व्हे करुन कोणत्या मुलभूत सुविधा अपेक्षित आहेत याचा आढावा घेवून तरतूद करावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्य सरकार धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले आहे
सध्याच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना इतकं हतबल व्हावे लागत आहे की, शेतकऱ्यांच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करण्याइतपत अधिकाऱ्यांची मजल गेली आहे. ही बाब महाराष्ट्राला लाजिरवाणी असताना सरकार मात्र सध्या धृतराष्ट्राची भूमिका पार पाडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पेरणीचा हंगाम सुरु झाला तरी शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नाही असल्याची बाब समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा आणि भल्याचा निर्णय हे सरकार घेताना दिसत नाही.
पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी अधिकारी करु लागले आहेत इतकी हतबलता शेतकऱ्यांमध्ये आली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा घटना नक्कीच लाज आणणाऱ्या आहेत असे प्रतिपादन मुंडे यांनी प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे.