मेयोतील प्रकार : मध्यरात्री डॉक्टर करतात तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:32 PM2019-08-12T23:32:37+5:302019-08-12T23:33:51+5:30
गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेयोमध्ये खरेच आरोग्याची काळजी घेतली जाते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकप्रतिनिधी असल्याने शासकीय यंत्रणेवर विश्वास ठेवून त्यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या मुलाला मेयोत दाखल केले. तातडीने उपचार मिळून मुलगा बरा होईल, ही अपेक्षा होती. परंतु अपघात विभाग असतानाही डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर यासंदर्भात जाब विचारल्यावर डॉक्टर आले. परंतु त्यांनी उपचार करण्यापेक्षा ‘कोण है वो, बाहर निकालो’ म्हणून वाद घातला. याचे वास्तव सीसीटीव्हीमधून आज समोर आल्याने खळबळ उडाली. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेयोमध्ये खरेच आरोग्याची काळजी घेतली जाते काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गांधीबाग परिसरातील एका ज्येष्ठ नगरसेवकाच्या मुलाची प्रकृती सोमवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास अचानक खालावली. त्यांनी तातडीने घरापासून जवळ असलेले मेयो गाठले. केस पेपर काढल्यानंतर ‘मेडिकल कॅज्युल्टी आॅफिसर’ (सीएमओ) यांच्याकडे घेऊन गेले. त्यांनी पाहिल्यावर अपघात विभागाच्याच वॉर्डमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. येथील एका नर्सने मुलाला सलाईन लावण्यासाठी ‘कॅथेटर’ लावले. परंतु त्यानंतर १ वाजून २२ मिनिटांपासून ते २ वाजून ५० मिनिटांपर्यंत एकही डॉक्टर किंवा नर्सने त्या मुलाकडे पाहिलेसुद्धा नाही. लोकप्रतिनिधीने याबाबत वॉर्डातील डॉक्टरांना व नर्सला किमान सलाईन तरी लावा, अशी विनंती केली. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दीड ते दोन तासावर वेळ होऊनही उपचार मिळत नसल्याचे पाहत लोकप्रतिनिधीने मुलाला खासगी इस्पितळात घेऊन जातो, असे सांगून नर्सला ‘कॅथेटर’ काढण्याची विनंती केली. परंतु नर्सने ‘मी खाटेजवळ येणार नाही, रुग्णाला माझ्याकडे आणा’, असे फर्मान सोडले. मुलाला आधार देत नर्सजवळ आणले असता, नर्सने उभ्या उभ्याच कॅथेटर काढले. त्यातून रक्त बाहेर येताच मुलगा चक्कर येऊन खाली कोसळला. लोकप्रतिनिधीने याबात जाब विचारला असता, तेथील निवासी डॉक्टरनेच ‘बाहर निकालो’ म्हणून सुरक्षा रक्षकांना बोलाविले. मुलाची प्रकृती पाहून लोकप्रतिनिधीने वाद न घालता तातडीने खासगी इस्पितळ गाठले.
लोकप्रतिनिधीने या प्रकरणाची तक्रार मोबाईलद्वारे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्याकडे केली. डॉ. पांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अपघात विभागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, लोकप्रतिनिधीने सांगितलेला प्रकार खरा निघाला. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधीला दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांचा फोन बंद होता.
दोषी डॉक्टर, नर्सवर कारवाई होणार
संबंधित लोकप्रतिनिधीने मोबाईलवरून घटनेची माहिती देत तक्रार केली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, डॉक्टर व नर्स यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचे दिसून येते. यामुळे मंगळवारी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, त्यानंतरच वरिष्ठांच्या सूचनेनुसार कारवाई करण्यात येईल. झालेल्या प्रकाराची लोकप्रतिनिधीकडे दिलगिरीही व्यक्त करण्यात आली आहे.
डॉ. सागर पांडे
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, मेयो