शहर बसमध्ये चोरीच्या घटना, कॅमेरे लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:11 AM2021-08-19T04:11:56+5:302021-08-19T04:11:56+5:30
परिवहन समिती सभापतींचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या आपली बसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांना आळा ...
परिवहन समिती सभापतींचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आपली बसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश बुधवारी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिले.
शहर बसमध्ये महिलांच्या पर्स, दागिने, साहित्याची चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी तेजस्विनी बसच्या धर्तीवर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, असे निर्देश समितीच्या बैठकीत दिले. परिवहन आयुक्त रवींद्र भेलावे, समितीचे सदस्य, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, परिवहन विभागाचे रवींद्र पागे आदी उपस्थित होते.
शहर बससेवेसाठी असलेल्या प्रत्येक डेपोची मोका तपासणी करून तेथे आवश्यक आणि गरजेच्या असलेल्या सर्व बाबींचा अहवाल तयार करून त्या तातडीने पूर्ण करा, पारडी येथील पास केंद्र त्वरित सुरू करा, असे निर्देशही कुकडे यांनी दिले. समिती सदस्य नितीन साठवणे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने कामचुकार इन्स्ट्रक्टरची हकालपट्टी करून नव्याने नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
.......
खर्च कोण करणार?
मनपाच्या आपली बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावयाचे झाल्यास यासाठी १६ लाख रुपये खर्च करावे लागतील. प्रभागातील नाली दुरुस्तीच्या तीन लाखाच्या फाईल मंजुरीसाठी नगरसेवक भटकंती करीत आहेत. अशा परिस्थितीत कॅमेऱ्यांचा खर्च मनपा करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.