महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून १५ हजार वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 08:46 PM2018-07-11T20:46:08+5:302018-07-11T20:50:04+5:30
जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा वतीने मोर्चा काढून महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून १५ हजार वेतन देण्याची मागणी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाचा वतीने मोर्चा काढून महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून १५ हजार वेतन देण्याची मागणी करण्यात आली.
राज्याच्या आरोग्य उपकेंद्रातून १०५०० महिला परिचर १९६६ पासून सेवा करीत आहेत. त्यांना केवळ १२०० रुपये तुटपुंजे मानधन शासनातर्फे देण्यात येते. महिला परिचरांना गृहभेटी, लसीकरण, आठवडी क्लिनिक, प्रसुती प्रकरणे आदी महत्त्वाची कामे करावी लागतात. त्यामुळे त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मिळणारे मानधन तुटपुंजे असून महिला परिचरांना १५ हजार मानधनासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी मॉरिस टी पॉईंट येथे हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी महिला परिचरांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून मागण्या रेटून धरल्या. मोर्चातील शिष्टमंडळाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. वित्तमंत्र्यांनी संघटनेची आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक बोलविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व मंगला मेश्राम, तुळसा काळे, रुख्मिणी पैठणे, मंजुळा बांगर, अलका मेश्राम, लता कांबळे आदींनी केले. लसीकरण सत्राचे परिश्रमक मिळाले पाहिजे,शस्त्रक्रिया शिबिरात रात्रपाळी लावणे बंद करावे,गृहभेटीसाठी प्रवास खर्च देण्यात यावा,मासिक मानधन दर महिन्याच्या १ तारखेला द्यावे आदी मागण्याही मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.