नागपुरातील उपायुक्तांसह १३ पोलिसांना महासंचालकांकडून सन्मानचिन्ह घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:13 PM2019-04-23T23:13:17+5:302019-04-23T23:15:38+5:30
पोलीस दलात १५ वर्षे उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल गुन्हे शाखा आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह ६ अधिकारी आणि ८ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मानाचे पदक जाहीर झाल्याने शहर पोलीस दलात आनंदीआनंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस दलात १५ वर्षे उल्लेखनीय सेवा दिल्याबद्दल गुन्हे शाखा आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह ६ अधिकारी आणि ८ कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. नागपूर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मानाचे पदक जाहीर झाल्याने शहर पोलीस दलात आनंदीआनंद झाला आहे.
पोलीस दलात सेवा देताना कोणताही आरोप लागणार नाही, याची काळजी घेत कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरवर्षी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. यंदा नागपुरातील तब्बल १४ जणांना हे पदक जाहीर झाल्याचे वृत्त मंगळवारी सकाळी आयुक्तालयात आले. त्यामुळे आनंदीआनंद पसरला. गुन्हे आर्थिक शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, प्रतापनगरचे ठाणेदार सुनील शिंदे, सध्या सीबीआय मध्ये प्रतिनियुक्तीवर असलेले पोलीस निरीक्षक संभाजी निवृत्ती मुरकुटे, सोनेगाव ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक किशोर सातोकर, अंबाझरी ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक शरद मिश्रा, विशेष शाखेचे हवलदार राहुल कन्नाके, विशेष शाखेचे हवलदार अरविंद दीक्षित, प्रतापनगरातील हवलदार देवेंद्र रायबोले, गुन्हे शाखेतील हवलदार संजय भजबुजे, हवलदार संतोष ठाकूर, पोलीस मुख्यालयातील हवलदार सचिन चिरडे आणि विशेष शाखेत कार्यरत असलेल्या नायक पोलीस शिपाई वैशाली शंकरराव शेंद्रे यांचा सन्मानचिन्ह प्राप्त करणारांमध्ये समावेश आहे. हे वृत्त पसरताच पोलीस दलासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या सर्वांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन !
उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरीसाठी मिळालेल्या या सन्मानचिन्हाबाबत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी उपरोक्त सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. एकाच वेळी आपल्या एवढ्या सहकाऱ्यांना मानाचे पदक जाहीर होणे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे म्हणून त्यांनी भविष्यात अशाच प्रकारे चांगली कामगिरी करून पोलीस दलाची मान उंच करावी, यासाठी डॉ. उपाध्याय यांनी उपरोक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.