दीक्षाभूमीसह नागपूर सजले : वस्त्यावस्त्यांमध्ये कार्यक्रमांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:05 PM2019-04-13T22:05:50+5:302019-04-13T22:09:49+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यत: उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरात चौका-चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक, शांतिवन चिचोली येथे मोठ्या संख्येने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यत: उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपुरात चौका-चौकांमध्ये रोषणाई करण्यात आली असून शहरातील प्रत्येक वस्त्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक, शांतिवन चिचोली येथे मोठ्या संख्येने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दीक्षाभूमी येथील मध्यवर्ती स्मारकाच्या डोमचे काम सुरूअसले तरी दीक्षाभूमी सजवण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर महामानवास मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे येथेही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर संयुक्त नागरी जयंतीनिमित्त येथे दोन दिवसीय मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यासोबतच दीक्षाभूमीवर आंबेडकरी बौद्ध अनुयायांची होणारी गर्दी लक्षात घेता येथे सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने सकाळी ९ वाजता सामूहिक बुद्धवंदना घेण्यात येईल. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात येईल.
संविधान चौकात भीम पहाट
संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. त्यामुळे येथेही अनेक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. रविवारी सकाळी ६ वाजता महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे भीम पहाट हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.
ड्रॅगन पॅलेसही सजले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ड्रॅगन पॅलेसवरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ८ वाजता भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना होईल. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्रातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात येईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित राहतील.
शांतिवन चिचोली येथे बुद्धवंदना
शांतिवन चिचोली येथेही रविवारी सकाळी ११ वाजता बुद्धवंदना घेण्यात येईल. यानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रम होईल. दिवसभर विविध कार्यक्रम घेण्यात येतील. यावेळी शांतिवन चिचोलीचे प्रमुख संजय पाटील उपस्थित राहतील.