उत्पन्न वाढले पण विकासासाठी निधी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:11 AM2021-08-25T04:11:34+5:302021-08-25T04:11:34+5:30
मनपा उत्पन्नात चार महिन्यात १२५ कोटींची वाढ : निधी नसल्याचे रडगाणे कायम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आर्थिक अडचणीत ...
मनपा उत्पन्नात चार महिन्यात १२५ कोटींची वाढ : निधी नसल्याचे रडगाणे कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेला दिलासा मिळाला आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यात मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर, नगर रचना व पाणीकरातून २३४.०७ कोटी जमा झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२४.१४ कोटींनी महसूल वाढला आहे. दुसरीकडे विकासासाठी निधी नसल्याचे रडगाणे सुरू आहे.
मागील चार महिन्यात मालमत्ता करातून ७५ कोटी जमा झाले. गेल्या वर्षी याच कालावधीत ५४.०३ कोटी जमा झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.९७ कोटींनी वाढ झाली आहे. नगर रचना विभागाचे ९९ कोटी उत्पन्न असून, मागील वर्षी या कालावधीत फक्त ५ कोटी जमा झाले होते. पाणीपट्टी वसुलीतही वाढ झाली आहे. यावर्षी ६०.७० कोटी जमा झाले आहे. गेल्या वर्षीची वसुली ५१.८३ कोटी होती.
राज्य सरकारकडून मनपाला दर महिन्याला जीएसटी अनुदान स्वरूपात १०८ कोटींचा निधी मिळतो. याचा विचार करता, मनपा तिजोरीत दर महिन्याला १६५ ते १७० कोटींचा महसूल येत आहे. ११० ते १२० कोटींचा आस्थापना खर्च वगळता, ४० ते ५० कोटींचा निधी उरतो.
...
उत्पन्नात वाढ, सर्वांना विकास निधी
गेल्या वर्षी २,७३१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. प्रत्यक्षात १,८९४ कोटींचा महसूल जमा झाला. स्थायी समितीने २०२१-२२ या वर्षाचा २,७९६.०७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मार्चपर्यंत २,१०० कोटीहून अधिक महसूल जमा होईल. उत्पन्न वाढीसाठी बुधवारपासून विभागवार बैठका घेत असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी दिली. विकास कामासाठी सर्व नगरसेवकांना समान निधी वाटप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
...
प्रमुख विभागाचा वित्त व मागील वर्षाचा जमा महसूल (कोटी)
मालमत्ता कर ७५ ५४.०३
नगर रचना ९९ ५.००
पाणीकर ६०.७० ५१.८३