उत्पन्नात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाची भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 01:24 AM2018-04-05T01:24:12+5:302018-04-05T01:24:23+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पहिला क्रमांक मिळविला आहे. विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २८५७.२० कोटी रुपये महसूल मिळविला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ४४.२ टक्के अधिक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत भारतीय रेल्वेत पहिला क्रमांक मिळविला आहे. विभागाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये २८५७.२० कोटी रुपये महसूल मिळविला आहे. हा महसूल मागील वर्षाच्या तुलनेत ४४.२ टक्के अधिक आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वात मागील आर्थिक वर्षात ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी विभागीयस्तरावर एक चमू गठित करण्यात आली होती. यात अधिकारी, निरीक्षक, पर्यवेक्षक, अधीक्षक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्या कठोर परिश्रमाने आणि सांघिक कामगिरीतून नागपूर विभागाने महसुलाच्या बाबतीत उच्चांक गाठून भारतीय रेल्वेत पहिले स्थान मिळविले आहे. मागील आर्थिक वर्षात विभागाने १९८१.६० कोटी रुपये मिळविले तर २०१७-१८ या वर्षात विभागाला २३५१.६८ कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात विभागाने ४४.२ आणि २१.५ टक्के अधिक उत्पन्न मिळविले. विभागीय प्रशासनाने वेकोलिसोबत निरंतर बैठक घेऊन वेकोलिच्या ७७६४ रॅक लोड केल्या. त्यापासून विभागाला २३८३.०१ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मागील वर्षी विभागाने वेकोलिच्या ५९६१ रॅक लोड केल्या होत्या. त्याचप्रमाणे एसीसी कंपनीसोबत पाच वर्षांसाठी करार करून ४८९ रॅकच्या माध्यमातून १४३.१४ कोटी रुपयांचा महसूल मिळविला. अंबुजा सिमेंटनेही तडाली गुड शेडमधृन माल वाहतूक करून ३५ रॅक मालाची वाहतूक केली. त्यापासून ९.१३ कोटी रुपये मिळाले. उत्तम ब्ल्यूवे स्टील वर्धा आणि मेसर्स जेएसडब्ल्यू स्टील कळमेश्वरच्या १४ आणि १८ तसेच बुटीबोरीच्या २ रॅकची वाहतूक करून ८.४० कोटी रुपये महसूल मिळविला. डीओसीच्या १३२.५ रॅकची वाहतूक करून ६०.४५ कोटी, एमएलएसडब्ल्यूच्या लोखंड आणि स्लेगच्या ९३ रॅक वाहतूक करून २८.७६ कोटी, बैतूल गुड्स शेडमधून साखरेच्या दोन रॅक तसेच बुटीबोरी गुड्स शेड येथून स्टोनच्या एका रॅकची वाहतूक केली.