सर्वोत्तम सेवेसाठी आयकर अधिकाऱ्यांनी डिजिटली सक्षम राहावे

By मोरेश्वर मानापुरे | Published: July 10, 2024 05:48 PM2024-07-10T17:48:14+5:302024-07-10T17:59:49+5:30

प्रधान मुख्य आयकर आयुक्त रिना त्रिपाठी : एनएडीटीमध्ये सहायक आयकर आयुक्तांच्या ‘उत्तरायण’ प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

Income tax authorities should be digitally enabled for best service | सर्वोत्तम सेवेसाठी आयकर अधिकाऱ्यांनी डिजिटली सक्षम राहावे

Income tax authorities should be digitally enabled for best service

नागपूर : आयकर विभागात फेसलेस असेसमेंट, सायबर फॉरेंन्सिस, डिजिटल सबमिशन यासारख्या उपक्रमांमध्ये करदात्यांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी अधिकाऱ्यांना निरंतर अद्ययावत ज्ञान आणि कौशल्य संपादन करावे लागते. शिवाय अधिकाऱ्यांनी डिजिटली सक्षम राहणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नागपूरच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्त रिना त्रिपाठी यांनी येथे केले.


आयकर विभागात सहायक आयुक्तपदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या ‘उत्तरायण’ या सात आठवड्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून रिना त्रिपाठी बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन छिंदवाडा रोड येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीमध्ये (एनएडीटी) बुधवारी करण्यात आले. यावेळी एनएडीटीचे प्रशिक्षण महासंचालक आनंद बैवार, अतिरिक्त महासंचालक (प्रशासन) मनीष कुमार, ‘उत्तरायण’ प्रशिक्षण वर्गाचे संचालक आणि अतिरिक्त महासंचालक आकाश देवांगण उपस्थित होते. त्रिपाठी म्हणाल्या, देशातील आयकरदात्यांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी सहायक आयुक्तांनी विभागात कार्यरत परीक्षावधीन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि आपले अनुभव प्रदान करावे. 


प्रास्तविक आनंद बैवार यांनी केले. मनीष कुमार यांनी नव्याने पदोन्नती झालेल्या सहायक आयकर आयुक्तांना कर प्रशासकाची शपथ दिली. आकाश देवांगन म्हणाले, सात आठवड्यांपेक्षा जास्त चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात अधिकाऱ्यांना आयकर प्रशासनस्तरावरील सर्व बाबींवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना अद्ययावत ज्ञान व कौशल्य प्रदान करण्यासह, आयकर संकलन, कर चुकवेगिरीचा सामना करण्याचे प्रशिक्षण, मनी लाँडिंग, आर्थिक घोटाळे व गुन्ह्याच्या तपासात परिपूर्ण होण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये एक आठवडा भारत दर्शनाचा समावेश आहे.


१३१ प्रशिक्षणार्थी अधिकारी सहायक प्रशिक्षण संचालक अरविंद कुमार वर्मा म्हणाले, या बॅचमध्ये देशाच्या विविध भागातील १३१ प्रशिक्षणार्थी अधिकारी असून त्यात ३८ महिलांचा समावेश आहे. सर्वाधिक अधिकारी महाराष्ट्रातील आहेत. या बॅचचे सरासरी वय ५४ वर्षे आहे. विभागात सुमारे २० ते २५ वर्षे सेवा दिलेल्यांना सहायक आयकर आयुक्तपदी पदोन्नती मिळते. सहायक प्रशिक्षण संचालक अभिनव मिश्रा यांनी आभार मानले. प्रारंभी रिना त्रिपाठी यांनी एनएडीटी परिसरात वृक्षारोपण केले. कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी अधिकारी, एनएडीटी आणि आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: Income tax authorities should be digitally enabled for best service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.