अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आयकर विभागाचा छापा, कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 02:27 PM2021-09-17T14:27:27+5:302021-09-17T14:58:22+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या रामदासपेठ येथील मिडास कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यांच्या सिविल लाईन परिसरातील घरी आयकर विभागाचे अधिकारी झडती घेत आहेत.
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आज सकाळी देशमुख यांच्या रामदासपेठ येथील मिडास कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले. त्यांच्या नागपूर सिविल लाईन परिसरातील निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी झडती घेत आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पद गमवावे लागलेले राज्याचे माजी गृहमंत्री व अनिल देशमुख हे आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आज सकाळी ११ च्या सुमरास आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यापैकी काही अधिकारी हे काटोल येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरी देखील गेल्याची माहिती आहे.
अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यान्हही या प्रकरणात सामोरे जावे लागले. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ईडीने अनिल देशमुख यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. पण एकदाही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले नाहीत. उलट समन्स रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
यापूर्वी ईडी, सीबीआयने अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. तर आता आयकर अधिकाऱ्यांनी आज त्यांचे कार्यालय व घरी छापे टाकले. यावेळी देशमुख घरी नव्हते मात्र, त्यांच्या पत्नी व काही खासगी कर्मचारी घरी होते.