आणखी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर आयकर छापे; कारवाईचा टप्पा वाढला
By मोरेश्वर मानापुरे | Published: November 2, 2023 10:48 PM2023-11-02T22:48:26+5:302023-11-02T22:48:37+5:30
अनंत अग्रवाल, अरूण अग्रवाल, मनीष चढ्ढावर बुधवारी कारवाई
नागपूर : आयकर विभागाने बुधवारी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर केलेल्या कारवाईनंतर गुरुवारी आणखी तीन कोळसा व्यापाऱ्यांवर छापे टाकले. त्यातील एक भंडाऱ्याचा तर दोन नागपुरातील आहेत. नव्याने छापे टाकलेल्या व्यापाऱ्यांची बुधवारी कारवाई केलेल्या व्यापाऱ्यांशी लिंक समोर आली आहे. गुरुवारी टाकलेल्या धाडीत अवैध व्यवहाराची कागदपत्रे, रोख आणि लॉकर्स सापडल्याची माहिती आहे.
आयकर विभागाने बुधवारी नागपुरातील संगीता सेल्स प्रा.लि.चे अनंत अग्रवाल व अरूण अग्रवाल या दोन भावांचे वर्धमाननगर येथील निवासस्थान व कार्यालये आणि चंद्रपूर येथील मनीष चढ्ढाचे घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.
तपासणी आणि चौकशीदरम्यान त्यांच्याकडूनही अवैध कोळसा व्यवहाराची कागदपत्रे, कोट्यवधींची रोख आणि लॉकर्स जप्त केले होते. त्यात या तिघांच्या व्यवहाराची अन्य तीन व्यापाऱ्यांशी लिंक असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा अधिकाऱ्यांनी छापे टाकले. आता टप्पा वाढल्याने कारवाई किती दिवस सुरू राहील, हे आता सांगणे कठीण आहे. आणखी काही व्यापारी अग्रवाल आणि चढ्ढा यांच्याशी संबंधित आहेत का, याचा शोध आयकर अधिकारी घेत आहेत. ही कारवाई नागपुरातील आयकर विभागाच्या ५० हून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांनी लॉकर्समध्ये कोळसा व्यवहाराची कागदपत्रे लपवून ठेवल्याच अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे ते व्यापाऱ्यांची कसून तपासणी करीत आहेत. ही कारवाई शुक्रवारीही सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.