उमरेड रुग्णालयात लसीकरणाची असुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:09 AM2021-04-02T04:09:03+5:302021-04-02T04:09:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. कडक उन्हात अगदी सकाळपासूनच वृद्धांची लसीकरणासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ग्रामीण रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. कडक उन्हात अगदी सकाळपासूनच वृद्धांची लसीकरणासाठी गर्दी होते. अशावेळी ज्येष्ठांच्या बैठकीचीही याेग्य व्यवस्था याठिकाणी उपलब्ध नाही. रुग्णालयातील अव्यवस्थेवर ज्येष्ठ नागरिकांनी आपला संताप वारंवार व्यक्त केल्यानंतरही शासन-प्रशासन, लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत नाहीत, असा आरोप केला जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप धरमठोक आणि वैद्यकीय अधीक्षक एस.एम. खानम यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे हा संपूर्ण प्रकार होत असल्याचा आरोप राजेश बांदरे, उमेश वाघमारे यांनी केला आहे.
गुरुवारी (दि.१) सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ज्येष्ठ नागरिकांची ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात रांग लागली होती. बाहेर बैठकीची तोकडी व्यवस्था करण्यात आल्याने अनेकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले, शिवाय काहींनी जमिनीवरच बैठक मारली. त्यातही लसीकरणासाठी उशीर लागल्याने अनेकांची घोर निराशा झाली. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. खानम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
....
येथेही होणार लसीकरण
उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयासह आता अन्य दोन ठिकाणीसुद्धा लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शुक्रवारपासून (दि.२) नगर परिषद इतवारी प्राथमिक शाळा आणि बायपास चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृहात लसीकरण सुरू होणार आहे. याठिकाणी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने केले आहे.