सामाजिक कामात सक्रियता वाढवा : शेती विकू नका, कर्ज काढून लग्न करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:46 PM2019-07-09T22:46:38+5:302019-07-09T22:48:21+5:30
तिरळे कुणबी समाज हा पालनकर्ता समाज आहे. मात्र, चुकीच्या चालीरीतीमुळे समाज अधोगतीकडे जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपली शानशौकत मिरविण्यासाठी शेती विकू नका, कर्ज काढून महागडे लग्नसोहळे करू नका. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. सामाजिक उपक्रमात, समाजाच्या कामात पुढाकार घ्या, सक्रियता वाढवा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तिरळे कुणबीसमाज हा पालनकर्ता समाज आहे. मात्र, चुकीच्या चालीरीतीमुळे समाज अधोगतीकडे जात आहे. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे. आपली शानशौकत मिरविण्यासाठी शेती विकू नका, कर्ज काढून महागडे लग्नसोहळे करू नका. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हा. सामाजिक उपक्रमात, समाजाच्या कामात पुढाकार घ्या, सक्रियता वाढवा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
तिरळे कुणबी सेवा मंडळातर्फे १० वी व १२ वीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे करण्यात आला. अध्यक्षस्थानी आ. सुधाकर देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, वैशाली सुधाकर कोहळे, नरेंद्र जिचकार, नरेश बरडे, मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे, उपाध्यक्ष कृष्णा बोराटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, एमयूएचएसच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे डायरेक्टर डॉ. संजय चौधरी, एनएमआरडीएचे कार्यकारी सदस्य संजय ठाकरे, अजय बोढारे यांचा नियुक्तीबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. देशमुख म्हणाले, कुणबी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप होत होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत तिरळे कुणबी समाजासाठी बिडीपेठ, म्हाळगीनगर चौक येथे समाज भवन मिळवून दिले. सामाजिक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. संजीव चौधरी यांनी सत्कारासाठी आभार मानत सामाजिक कामासाठी आपण आयुष्यभर पुढाकार घेत राहू, असे आश्वस्त केले. संचालन वैशाली चोपडे यांनी केले. आभार डॉ. रमेश गोरले यांनी मानले.
समाजाच्या सक्रियतेमुळेच मंत्रिपद : देशमुख
गेल्या काळात कुणबी समाजात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. त्यानंतर कुणबी समाज मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला. समाजाचा एक दबाव राजकीय व्यवस्थेवर पडला. वातावरणनिर्मिती झाली. त्यामुळेच राज्याच्या मंत्रिमंडळात डॉ. परिणय फुके, डॉ. संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे तर केंद्रात संजय धोत्रे यांच्या रूपात कुणबी समाजाला केंद्रात मंत्रिपद मिळाले, असे मत आ. सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केले.
मुलांवर दबाव टाकू नका : फुके
पालकांनी करिअरची निवड करण्यासाठी मुलांवर मानसिक दबाव टाकू नये. त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करावा. डॉक्टर, इंजिनिअर शिवायही अनेक क्षेत्र आहेत, असे सांगत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
समाज भवनासाठी निधी द्या : चोपडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिरळे कुणबी समाजासाठी बिडीपेठ, म्हाळगीनगर चौक येथे समाज भवन उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी नासुप्रकडे मोठा निधी जमा करायचा आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने शक्तीनुसार निधी देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रमेश चोपडे यांनी प्रास्ताविकातून केले. समाज भवनाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. तेथे विविध उपक्रम राबविले जातील. त्याचा समाजाला फायदा होईल. यातून एक सामाजिक चळवळ उभी होईल, असेही त्यांनी सांगितले.
सत्कारासाठी हार-बुके नाही
तिरळे कुणबी सेवा मंडळाने या कार्यक्रमात एक आदर्श निर्माण केला. गुणवंत विद्यार्थी तसेच मान्यवरांच्या सत्कारासाठी हार-बुके वापरले नाहीत, तर प्रत्येकाला रोपटे भेट दिले. प्रत्येकाने एक झाड लावून, ते जगवून पर्यावरणाचे संवर्धन करावे, असा संदेश या माध्यमातून देण्यात आला.