सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यावर भर
By admin | Published: September 27, 2015 02:48 AM2015-09-27T02:48:59+5:302015-09-27T02:48:59+5:30
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री : पाटबंधारे विभागाची सर्वसाधारण सभा
नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वैनगंगानगर येथील पाटबंधारे वसाहतीत आयोजित २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. सुधाकर देशमुख होते. अभियंता संजय खोंडे अध्यक्षस्थानी होते. मान्सूनच्या पावसाची अनियमितता पाहता राज्यात जास्तीतजास्त पाणी अडविण्यावरा सरकारचा भर आहे. शेतकऱ्यांसाठी रब्बी सिंचनाचे क्षेत्र कमी होऊ देणार नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सिंचनाचा आढावा घेण्यासाठी जलसंपदा मंत्री व पालकमंत्र्यांनी याबाबत बैठक घ्यावी. विदर्भ पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था ही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आज अग्रेसर आहे. तसेच या पतसंस्थेतील कर्मचारी, अधिकारी आणि भागभांडवलदारांच्या अडीअडचणींकरिता या पतसंस्थेद्वारे नेहमी मदत केली जाते. ही कौतुकास्पद बाब आहे.
प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या योजना उल्लेखनीय असून सर्वांच्या प्रयत्नाने ही संस्था शिखरावर पोहोचली आहे, असे पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. यावेळी गुणवंत विद्यार्थी तेजेश माणिकपुरे या विद्यार्थ्याचा मुख्यमंत्र्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला ज्ञानेश्वर महल्ले, कार्यकारी अभियंता संजय वानखेडे, विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे, अधीक्षक अभियंता र. क्रु. ढवळे यांच्यासह पतसंस्थेचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साहाय्यता निधीसाठी ५१ हजारांचा धनादेश
पाटबंधारे विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीकरिता ५१ हजारांचा धनादेश आणि एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.