कळमना भाजी बाजारात खरेदी-विक्री वेळ वाढवावी; अडतियांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 10:09 PM2020-04-26T22:09:23+5:302020-04-26T22:09:48+5:30
कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारपासून सुरू करण्यात आलेल्या कळमना भाजी बाजारात व्यवसायाची वेळ वाढवून सकाळी १० पर्यंत करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव आणि किरकोळ विके्रत्यांना भाज्या खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल तसेच ग्राहकांना ठराविक बाजारातून किफायत भावात भाज्यांची खरेदी करता येईल, अशी स्पष्टोक्ती अडतियांनी समितीकडे पाठविलेल्या पत्रात दिली आहे.
अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, बाजारात २०५ अडतिया असून दररोज ५० च्या बॅचला व्यवसाय करायचा आहे. व्यवसायाची वेळ रात्री १ ते सकाळी ७ पर्यंत ठेवली आहे. त्यानंतर व्यवसाय करणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. तसेच प्रत्येक अडतियाला दोन गाड्या भाज्या विकण्याची परवानगी आहे. शनिवारी पहिल्या दिवशी सकाळी ६.३० पासूनच समितीच्या कर्मचाºयांनी बाजार बंद करायला सुरुवात केली आणि सकाळी ७ वाजता बाजार बंद केला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भाज्या विक्रीविना परत जावे लागले. हीच स्थिती रविवारी होती. भाज्या विक्रीसाठी एक तर कमी वेळ मिळाला शिवाय दुचाकीला प्रतिबंध आणि ठराविक संख्येत तीनचाकीला परवानगी असल्याने फार कमी विक्रेते ग्राहक बाजारात आले. त्यामुळे बाजाराची वेळ पहाटे ४ ते सकाळी १० पर्यंत केल्यास किरकोळ विक्रेत्यांना खरेदीला वेळ मिळेल आणि शेतकऱ्यांच्या भाज्यांची विक्री होईल, असे गौर म्हणाले.
गर्दी होऊ नये म्हणून समितीने बाजाराला मुख्य भाजी बाजार, १ ते ६ इमारतीतील १४४ गाळे, आणि न्यू गे्रन मार्केट अशा तीन भागात विभागले आहे. हे अंतर कळमन्याच्या चिखली बाजारापासून अर्धा ते पाऊण किमी आहे. त्यामुळे ग्राहक न्यू ग्रेन मार्केटमधील भाजी बाजारात जात नाहीत. शनिवारी आणि रविवारी ग्राहक या बाजाराकडे फिरकले नाहीत. अखेर शेतकऱ्यांना भाज्या परत न्याव्या लागल्या. भाज्या कुठे विकायच्या, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अखेर गेटबाहेर बसून त्यांना विक्री करावी लागली. तेथूनही कर्मचारी आणि पोलिसांना त्यांना हाकलून लावले. समितीने वेळ निश्चित करताना अडतिया आणि व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. वेळ वाढल्यास भाज्यांच्या खरेदी-विक्रीची सुविधा होईल, असे गौर म्हणाले.