स्थानिक शहरी संस्थांची क्षमता वाढवावी
By admin | Published: September 8, 2016 02:38 AM2016-09-08T02:38:55+5:302016-09-08T02:38:55+5:30
शहरातील स्थानिक संस्थांचा महसूल वाढविण्यासाठी त्यांची विश्वासार्हता आणि प्रतिमा वाढविण्याची गरज आहे.
जुल्फेश शाह यांचे प्रतिपादन : संशोधन मार्गदर्शन कार्यशाळा
नागपूर : शहरातील स्थानिक संस्थांचा महसूल वाढविण्यासाठी त्यांची विश्वासार्हता आणि प्रतिमा वाढविण्याची गरज आहे. यासाठी विविध सकारात्मक मार्गांचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन द इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाच्या (आयसीएआय) राष्ट्रीय आर्थिक सल्लागार समिती, नवी दिल्लीचे सदस्य सीए जुल्फेश शाह यांनी येथे केले.
समितीच्या वतीने आयसीएआय भवन, नवी दिल्ली येथे ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा महसूल वाढविणे’ या विषयावर संशोधन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. मंचावर समितीचे अध्यक्ष सीए अतुल गुप्ता आणि उपाध्यक्ष सीए अनिल भंडारी उपस्थित होते. कार्यशाळेत अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी, अर्थतज्ज्ञ आणि नामांकित विद्यापीठातील प्राध्यापकांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर महसूल जीडीपीचे प्रमाण वाढविणे आणि अन्य विविध विषयावर मार्गदर्शन केले. प्रारंभी अतुल गुप्ता यांनी समितीचे उद्दिष्ट आणि कृती योजनेची माहिती दिली. अनिल भंडारी यांनी विविध विषयावर सादरीकरण केले. शेतकऱ्यांना आर्थिक साक्षर करा
भारतीय शेतकरी संघटनेचे महासचिव बोजा डी. रामी रेड्डी यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेसंबंधी विविध मुद्यांवर माहिती दिली. शेतकऱ्यांना आर्थिक साक्षर करण्यासह देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांचे प्रती एकर उत्पादन कसे वाढेल, याकडे लक्ष देण्याची मागणी समितीच्या सदस्यांकडे केली.
हरियाणा वित्त आयोगाचे चेअरमन प्रा. मुकुल आशेर यांनी शहरी स्थानिक संस्थांच्या सूक्ष्म अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. सेवा कर, नवी दिल्लीचे अतिरिक्त आयुक्त सचिन जैन, ग्लोबल पानिपत हरियाणाचे प्रा. सीए बलराम नंदवानी, जयपूर विद्यापीठाचे प्रा. सी.एस. बारला, एक्झिम बँकेच्या एक्पोर्ट प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक सीए हर्षा बंगारी यांनी मार्गदर्शन केले.कार्यशाळेत आयसीएआयचे अध्यक्ष एम. देवराज रेड्डी, उपाध्यक्ष नीलेश विकमसे आदींसह जी. शेखर, रणजितकुमार अग्रवाल, राजेश शर्मा, मंगेश किनारे आदी सीसीएम आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)