नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:44 PM2019-12-26T19:44:23+5:302019-12-26T19:45:44+5:30

ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

Increase in cold, cough and asthma patients in Nagpur | नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ

नागपुरात सर्दी, खोकला व दम्याच्या रुग्णांत वाढ

Next
ठळक मुद्देबदलत्या वातावरणाचा शरीरावर प्रभाव : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर गारठले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाचा शिडकावा आणि थंडगार वाऱ्यामुळे नागपूरकर चांगलेच गारठले आहे. अचानक बदललेल्या या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ‘व्हायरल फिवर’ व दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. हे वातावरण विशेषत: घसा आणि फुफ्फुसामध्ये इन्फेक्शनचे प्रमाण वाढवित असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ज्येष्ठांमध्ये वात, कंबरदुखी, मणक्यांचे आजारही बळावले आहेत.
थंडी सुखद वाटत असली तरी वृद्ध आणि लहान मुलांसाठी हा ऋतू त्रासदायक ठरतो. अंगातील ऊर्जा कमी झाल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवते. सांधेदुखी, सर्दी, खोकला, दमा यासारखे विकार थंडीत हमखास डोके वर काढतात. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुलांसाठी हे दिवस कसोटीचे असतात. मात्र थोडीफार काळजी घेतल्यास यातील बऱ्याचशा त्रासापासून सुटका होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नवजात बालकांना हायपोथर्मियाची भीती-डॉ. अग्रवाल
बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल यांनी सांगितले, नवजात बालके थंड पडल्यास ‘हायपोथर्मिया’ आजार होऊन जीवाला धोका निर्माण होण्याची भीती असते. नवजात बालकांना किमान ३४ ते ३५ अंश तापमानाची गरज असते. यामुळे अशा बालकांना आईने वरचेवर दूध पाजावे. कापडात गुंडाळून ठेवावे. या दिवसात बाळाला आवश्यक उष्णता मिळणे आवश्यक असते.

सर्दी, व्हायरलच्या रुग्णांनापासून दूर रहा- डॉ. गावंडे
बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, बदललेल्या या हवामानामुळे सर्वाधिक रुग्ण सर्दी, खोकला, दम्याचे दिसून येत आहे. या शिवाय, नाक चोंदणे, सारख्या शिंका येणे, डोळे लाल होणे, ऐकायला थोडे कमी येणे, डोकेदुखी, ताप, थकवा, भूक मंदावणे ही ‘व्हायरल’ तापाची लक्षणे आहेत. सध्या या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. हा ताप संसर्गजन्य असल्यामुळे आजारी व्यक्तींचा संपर्क टाळणे किंवा कमी करावा. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.

अस्थमाच्या रुग्णांत ५० टक्क्याने वाढ -डॉ. गिल्लुरकर
फिजिशियन डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांनी सांगितले थंडी, हवेतील प्रदूषण व धुरामुळे अस्थमा म्हणजेच दम्याच्या रुग्णांत गेल्या काही दिवसात ५० टक्क्याने वाढ झाली आहे. यात साधारण १२ ते १८ आणि त्याही पुढील वयोगटातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री खोकला येणे, सामान्य औषधांनीही बरा न होणे, दम लागणे ही अस्थम्याची लक्षणे आहेत. अशा रुग्णांची चाचणी करून किती श्वास नळ्या ‘ब्लॉक’ आहेत त्या तपासल्या जातात आणि त्यानुसार औषधोपचार केले जातात. यात ‘इनहेलर’ ही सर्वात फायदेमंद औषध आहे. वरील लक्षणे दिसणाºया रुग्णांनी त्वरित उपचार घेणे आवश्यक असते.
 

‘हार्ट अटॅक’चा धोका वाढतो-डॉ. देशमुख
हृदयविकार तज्ज्ञ डॉ. पी.पी. देशमुख म्हणाले, अतिथंडीमुळे रक्तवाहिन्या, सांधे अखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो. अशा परिस्थितीत हृदयविकार असणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका (हार्ट अ‍ॅटक) येण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा अंदाज नाही अशांसाठी हे धोकादायक ठरू शकते. म्हणून थंडीत हृदयाची काळजी घेणे आवश्यक असते.

 

Web Title: Increase in cold, cough and asthma patients in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.