संक्रमण वाढताच पुन्हा कोरोना कचऱ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:08 AM2021-04-15T04:08:51+5:302021-04-15T04:08:51+5:30

नागपूर : मार्च महिन्यापासून कोरोना संक्रमण वाढायला लागताच पुन्हा कोविड कचराही मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला आहे. शहरातून रोजचा सरासरी ...

Increase in corona waste again as infection increases | संक्रमण वाढताच पुन्हा कोरोना कचऱ्यात वाढ

संक्रमण वाढताच पुन्हा कोरोना कचऱ्यात वाढ

Next

नागपूर : मार्च महिन्यापासून कोरोना संक्रमण वाढायला लागताच पुन्हा कोविड कचराही मोठ्या प्रमाणावर वाढायला लागला आहे. शहरातून रोजचा सरासरी १२५ मेट्रिक टन कोविड कचरा निघत असल्याने ताणही प्रचंड वाढला आहे. यामुळे या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यासाठी सक्षमपणे उपाययोजनांची गरज आहे.

नागपूर शहरामध्ये कोरोनाचे संक्रमण येण्यापूर्वी दहाही झोनमधून रोजचा २,८०० ते ३ हजार किलो (२.८ ते ३ टन) जैविक कचरा निघत होता. मात्र कोरोना संक्रमणानंतर रोजचा कचरा संकलनाचा आकडा सरासरी ५ हजार ते ५,३०० किलोवर (५ ते ५.४ टन) पोहचला आहे. विशेष म्हणजे यात कोरोना कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, महानगरपालिकेकडील नोंदीनुसार जानेवारी-२०२० मध्ये शहरातून ११९.०८ मे. टन जैविक कचरा संकलित झाल्याची नोंद आहे. मार्च-२०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव नागपुरात झाल्यावर जैविक कचरा ८५.८५२ मे. टन तर ८१ किलो कोविड कचरा निघाला. तर एप्रिल महिन्यात कोविड कचरा वाढून २०.६३३ मे. टनावर पोहचला. २०२० या वर्षात ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक म्हणजे ५४.४९९ मे. टन कोविड कचरा निघाल्याची नोंद आहे. आता कोरोना रुग्णांचा आकडा सहा हजारावर गेला असताना कोविड कचराही वाढला आहे. शहरात सध्या रोज चार हजार किलोग्रॅम जैविक कचरा निघत असून, त्यात सरासरी एक हजार किलो कोरोना कचरा असतो. या आकडेवारीवरून या महिन्यातील कोरोना कचरा सरासरी १२५ टनावर जाईल, असे दैनिक संकलनावरून दिसत आहे.

...

नागपुरात १,८०० मालमत्तांमधून कोविड, मेडिकल कचऱ्याची उचल

नागपूर शहरात सध्या १,८०० मालमत्तांमधून कोविड कचरा आणि मेडिकल कचऱ्याची उचल होते. यात ६३२ रुग्णालये, दवाखाने, प्रयोगशाळा, एक्स-रे (रेडिओलॉजी) केंद्रांचा समावेश आहे. केंद्र सरकारने १९९८ मध्ये बायोमेडिकल वेस्ट (मॅनेजमेंट हॅन्डलिंग रुल्स) कायद्यानुसार रुग्णालयांना नोंदणी बंधनकारक केली आहे.

...

अद्यापही गांभीर्य नाही

एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमण वाढले असतानाही खुद्द रुग्णालये गंभीर दिसत नाहीत. अलीकडेच मेडिकल कचरा उघड्यावर फेकल्याप्रकरणी मनपाच्या पथकाने एका लॅबसह अन्य संचालकांवर १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. मागील जानेवारी-२०२० ते नोव्हेंबर-२०२० या काळातत नियम न पाळल्याने ६३ व्यक्ती व हॉस्पिटलवर दंडात्मक कारवाई झाली होती. त्यातून १० लाख २७ हजार रुपयांचा दंड वसूल झाला होता.

...

कोट

संक्रमण वाढण्याला कोरोना कचराही कारणीभूत आहे. कोरोना संक्रमण वाढीसोबतच कोरोना कचरा वाढणार हे लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि मनपाने संयुक्त मोहीम उभारायला हवी. या महिन्यात झालेली रुग्णवाढ संक्रमणाच्या दृष्टीने अधिक धोकादायक आहे.

- श्रीकांत टेकाडे, पर्यावरण व वनतज्ज्ञ

...

Web Title: Increase in corona waste again as infection increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.