नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ : आयसोलेशनमध्ये ९२ रुग्णांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:03 AM2019-04-09T01:03:02+5:302019-04-09T01:03:51+5:30
दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेला महानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या आजारासाठी राखीव असलेला
महानगरपालिकेचा आयसोलेशन दवाखान्यामध्ये सोमवारी ९२ रुग्णांनी उपचार घेतले. मेयो, मेडिकलमध्येही या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती आहे.
उन्हाच्या तडाख्याने उष्माघात, साथरोगाची शक्यता अधिक असते. याच दिवसात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने पाण्याच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. दूषित पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचा फैलाव वाढतो. यामध्ये गॅस्ट्रो हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी यांच्या संसर्गामुळे गॅस्ट्रो हा आजार होतो. दूषित पाण्यासोबतच शिळे, अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्न, उघड्यावर ठेवलेले पदार्थ यावाटे हा संसर्ग होऊ शकतो. उलटी-जुलाब ही रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या आजारातून रुग्णांना आजाराच्या सुरुवातीच्या काळात पोटात मुरडा येतो, उलटी आणि जुलाब होतात. दूषित पाणी वा अस्वच्छ अन्न पोटात गेल्यानंतर पुढील १२ ते ७२ तासांमध्येच हा त्रास सुरू होतो. काही रुग्णांमध्ये याची लक्षणे तीव्र असतात. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात मनपाच्या आयसोलेशन दवाखान्याच्या बाह्यरुग्ण विभागात गॅस्ट्रोच्या सुमारे दीड हजार रुग्णांनी तर आंतररुग्ण विभागात ४० रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. एप्रिल महिन्यात रुग्णांची संख्या वाढली असून, सोमवारी ८ एप्रिल रोजी ९२ रुग्णांनी उपचार घेतले.
पाण्याच्या शुद्धतेकडे लक्ष द्या-डॉ. गावंडे
डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत बाळगा. रस्त्याकडील हातठेल्यांवरील थंडपेय, बर्फाचा गोळा खाऊ नका. अस्वच्छ परिसरातील अन्नपदार्थ खाणे टाळा. पाणीपुरी किंवा तत्सम पदार्थ खाताना विक्रेत्याचे हात स्वच्छ आहेत की नाही, याची खात्री करून घ्या. मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार असलेले रुग्ण किंवा रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या रुग्णांनी बाहेरील पाणी कटाक्षाने टाळावे. गॅस्ट्रोमध्ये उलटी व जुलाब होतात. ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय साखर आणि लिंबू घातलेले घरी तयार केलेले सरबत, इलेक्ट्रॉल किंवा ‘ओआरएस’ घेता येईल. या आजारात पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पचावयास हलके अन्नपदार्थ खावेत. काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत.