देशहितासाठी आयकर संग्रहण वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:19 AM2018-04-21T01:19:57+5:302018-04-21T01:20:07+5:30
योग्य वेळी निर्णयप्रक्रिया न झाल्यास देशाचे नुकसान होते. अधिकाऱ्यांनी विवेकबुद्धीचा वापर करून वेळ न दडविता व प्रकरणे प्रलंबित न ठेवता योग्य निर्णय घेऊन देशहितासाठी आयकर संग्रहण वाढविण्याचे आवाहन केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अधिया यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : योग्य वेळी निर्णयप्रक्रिया न झाल्यास देशाचे नुकसान होते. अधिकाऱ्यांनी विवेकबुद्धीचा वापर करून वेळ न दडविता व प्रकरणे प्रलंबित न ठेवता योग्य निर्णय घेऊन देशहितासाठी आयकर संग्रहण वाढविण्याचे आवाहन केंद्रीय वित्त सचिव डॉ. हसमुख अधिया यांनी येथे केले.
मानकापूर रोड येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या (एनएडीटी) सभागृहात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भारतीय महसूल सेवेतील ७० व्या तुकडीच्या दिक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे प्रशासकीय सदस्य बी. डी. विष्णोई, एनएडीटीचे प्रधान महासंचालक डॉ. पुष्पेंद्रसिंग पुनिया, अतिरिक्त महासंचालिका-३ लीना श्रीवास्तव, अतिरिक्त महासंचालिका-२ नौशिन जहॉ अन्सारी व अतिरिक्त महासंचालक-१ राजीव रानडे आणि प्रशिक्षण संचालक संजय धारिवाल होते.
अधिकाºयांनी व्यापक क्षेत्र निवडावे
डॉ. अधिया म्हणाले, वस्तू सेवा करासंदर्भात आतापर्यंत जीएसटी परिषदेच्या २७ बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीत वस्तू सेवा कराची आकारणी, अधिभार, कायदेशीर कार्यवाही या विषयी चर्चा करून त्वरित निर्णय घेण्यात आले. नोकरीमध्ये पद किंवा हुद्दा यापेक्षा नोकरी करण्याचा मार्ग व दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. आयकर अधिकाऱ्यांना इतर शासकीय विभागामध्ये प्रतिनियुक्तीच्या संधी मिळतात. त्याचा त्यांनी लाभ घेऊन एक व्यापक कार्यक्षेत्र निवडावे, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यशैलीत कर्मयोगाच्या पंचसूत्रीचा अवलंब करावा. कोणतेही कार्य करतांना आचारसंहितेला तडा जाणार नाही, याची काळजी घ्यावी. आयकर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवरचा अनुभव अर्थमंत्रालयातील वरिष्ठांसोबत मांडावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बी.डी. विष्णोई म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत व राष्ट्रनिमार्णामध्ये आयकर विभागाची महत्त्वाची भूमिका असते. आयकर अधिकारी कर संकलनाच्या माध्यमातून विकास कार्यासाठी देशाला लागणारा निधी शासनाच्या राजकोषात जमा करतात. मूल्यांकन अधिकारी म्हणून आयकर अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे व कायद्याच्या चौकटीत राहून आपले कर्तव्य बजावावे.
या तुकडीतील एकूण १५३ अधिकाऱ्यांपैकी ४२ अधिकारी महिला आणि दोन रॉयल भूतान सेवेतील अधिकारी होते. तुकडीतील ४० अधिकाऱ्यांनी अवयवदाते म्हणून अवयवदान शिबिरात नोंदणी केली. विविध श्रेणीत १० अधिकाऱ्यांना सुवर्ण पदक तर सर्व १५३ अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सहयोगी प्रशिक्षण संचालक-२ ऋषी कुमार बिसेन यांनी आभार मानले. यावेळी अधिकाऱ्यांचे पालक, अकादमीतील शिक्षक, आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.