पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाईत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:48 AM2018-05-30T00:48:05+5:302018-05-30T00:48:26+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वधारल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. डिझेल ७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर पडला असून आठ दिवसांत भाडे ८ ते १० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंसह फळे आणि भाजीपाला महागला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वधारल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. डिझेल ७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्याचा परिणाम मालवाहतुकीवर पडला असून आठ दिवसांत भाडे ८ ते १० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंसह फळे आणि भाजीपाला महागला आहे.
मालवाहतूकदारांनी सांगितले की, १० टन क्षमतेच्या वाहनांच्या मालवाहतूक भाड्यात कि़मी.च्या आधारावर १० ते १५ टक्के वाढ झाल्यामुळे ट्रकमधून जाणारा मालही महाग झाला आहे. वाहन आणि मायलेजच्या आधारावर किमतीत वाढ होत आहे. मालवाहतुकीसाठी जास्तीत जास्त १० टन क्षमतेच्या वाहनांचा उपयोग करण्यात येतो. त्याचा मायलेज सहा ते सात कि़मी. आहे. अशा वाहनांचे भाडे दोन हजारांपेक्षा जास्त वाढले आहे.
छोट्या मालवाहतूकदारांचे प्रति ट्रीप भाडे वाढले
कळमना बाजारात फळे आणि भाजीपाला आल्यानंतर किरकोळ बाजारात विक्रीला नेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या छोट्या मालवाहतूकदारांचे प्रति ट्रीप भाडे वाढले आहे. या क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांनी सांगितले की, सुमारे १५० रुपये प्रति ट्रीपमध्ये वाढ झाली आहे. अंतर आणि वजनाच्या आधारावर भाडे आकारण्यात येत आहे. कळमना बाजारात पोहोचणे आणि तेथून शहराच्या अन्य बाजारात फळे आणि भाजीपाला पोहोचविण्यापर्यंतचा खर्च पेट्रोल आणि डिझेल भाववाढीमुळे ग्राहकांना उचलावा लागत आहे.
जास्त क्षमतेच्या ट्रकच्या मागणीत घट
या संदर्भात गांधीबाग येथील ट्रान्सपोर्टर कुक्कू मारवाह यांनी सांगितले की, नोटाबंदी, जीएसटी आणि आता डिझेलच्या भाववाढीमुळे ट्रान्सपोर्टरचा व्यवसाय ठप्प झाला आहे. भाडे वाढल्यामुळे मोठ्या वाहनांची मागणी कमी झाली आहे. मायलेजमुळे व्यापारी छोट्या वाहनांद्वारे कमी अंतरावर माल पोहोचवित आहेत. तीन ते चार व्यापाऱ्यांचा माल कमी क्षमतेच्या एकाच वाहनांमध्ये पाठविण्यात येत आहे. अशा स्थितीत १० टनपेक्षा जास्त क्षमतेच्या वाहनांची मागणी कमी झाली आहे. आठ ते दहा दिवसांत १६ टन, २१ टन आणि २७ टन क्षमतेच्या वाहनांमधून माल फारच कमी प्रमाणात जात आहे. नागपुरात पाच ते सात हजार ट्रक असून त्यांचे मालक आणि कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर संकट आले आहे.
१५०० रुपयांपर्यंत फरक
पेट्राल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे गेल्या काही दिवसात मालवाहतूक भाडे १० ते १५ टक्के अर्थात १५०० रुपयांपर्यंत वाढले आहे. अशा स्थितीत बाजारात येणाऱ्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंवर तेजीचा परिणाम झाला आहे.
प्रकाश वासानी, माजी अध्यक्ष,
आलू-कांदे अडतिया असो. कळमना.
मालवाहक वाहनांचे भाडे वाढले
डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहनांचे प्रति कि़मी. भाडेसुद्धा वाढले आहे. त्यामुळे अंतर आणि मायलेजच्या आधारावर मालवाहतूक होत आहे. शहरात धावणाऱ्या वाहनचालकांनी प्रति ट्रीपमध्ये १५० रुपयांची वाढ केली आहे.
नंदू गौर, अध्यक्ष,
भाजी मार्केट, कळमना.