नव्या रुग्णांत वाढ; मात्र, मृत्यूची संख्या स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:13+5:302021-07-03T04:07:13+5:30
नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या मागील दोन महिन्यांत ७ हजारांवरून १६ वर आली. मात्र, शुक्रवारी नव्या रुग्णांची संख्या वाढून ...
नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या मागील दोन महिन्यांत ७ हजारांवरून १६ वर आली. मात्र, शुक्रवारी नव्या रुग्णांची संख्या वाढून ४८ झाल्याने चिंतेचे सावट पसरले आहे. विशेष म्हणजे, पॉझिटिव्हिटीचा दर वाढून ‘०.५६’ टक्क्यांवर गेला आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,७७,१३४ झाली असून, मृतांची संख्या ९,०२५ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील सहा दिवसांपासून मृत्यूची संख्या स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३०, ग्रामीणमधील १८ रुग्ण आहेत. आज ८७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,६७,८८५ झाली. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ९८.०६ टक्के झाले आहे. नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ८,५३५ तपासण्या झाल्या. यात शहरातील ६,८४८ तर ग्रामीणमधील १,६८७ आहेत. नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्याही कमी झाली आहे.
- होम आयसोलेशनमध्ये ६५ रुग्ण
शुक्रवारी जिल्ह्यात २२४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. यात शहरातील १८० तर ग्रामीणमधील ४४ रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये केवळ ६५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. विविध शासकीयसह खासगी रुग्णालयांत १५९ रुग्ण उपचार घेत आहेत.