सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:13 AM2020-12-05T04:13:15+5:302020-12-05T04:13:15+5:30
नागपूर : कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या मागील काही दिवसांत ४०० ते ५०० दरम्यान स्थिरावल्याचे दिसून येत आहे. परंतु सक्रिय रुग्णांची ...
नागपूर : कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या मागील काही दिवसांत ४०० ते ५०० दरम्यान स्थिरावल्याचे दिसून येत आहे. परंतु सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवाळीपूर्वी ३,१७९ असलेली ही रुग्णसंख्या आता ५,५७८ वर पोहचली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत याचे प्रमाण ४.९० टक्के आहे. शुक्रवारी ४२२ नवे रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूणसंख्या १,१३,६९१ तर मृतांची संख्या ३,७१४ झाली आहे.
नागपूर जिल्ह्यातील सहा शासकीय प्रयोगशाळांसह खासगी लॅब मिळून आज ५,०९६ संशयित रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. यातून पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील ३३४, ग्रामीणमधील ८७ तर जिल्ह्याबाहेरील १ आहे. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीणमधील १ तर जिल्ह्याबाहेरील १ आहे. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८.२८ टक्के आहे. तर, निगेटिव्हि येणाऱ्यांचे प्रमाण ९१ टक्क्यांवर आहे. आज एम्सच्या प्रयोगशाळेत १५, मेडिकलच्या प्रयोगशाळेत ९०, मेयोच्या प्रयोगशाळेत ७२, माफसूच्या प्रयोगशाळेत २३, नीरीच्या प्रयोगशाळेत ४२, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ४७, खासगी लॅबमध्ये ११४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अन्टिजेन चाचणीत १९ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले.
-रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात घट
दिवाळीपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७० टक्क्यांवर होते. राज्याच्या तुलनेत हा दर १.२६ टक्क्याने अधिक होता. परंतु आता तो ९१.८३ टक्क्यांवर आला आहे. मागील काही दिवसांत नव्याने भर पडणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज २६२ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १,०४,३९९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात १,४५७ रुग्ण तर ४,१२२ असे रुग्ण उपचार घेत आहेत.
::कोरोनाची आजची स्थिती
-दैनिक संशयित : ५,०९६
-बाधित रुग्ण : १,१३,६९१
_-बरे झालेले : १,०४,३९९
- उपचार घेत असलेले रुग्ण : ५,५७८
- मृत्यू : ३,७१४