कोविड ब्रॉड डेडच्या संख्येत वाढ; रुग्णालयात येण्यापूर्वीच २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 12:18 PM2020-10-21T12:18:24+5:302020-10-21T12:18:45+5:30
Corona Nagpur News मागील सात दिवसात रुग्णालयात येण्यापूर्वीच २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसापासून नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु मागील सात दिवसात रुग्णालयात येण्यापूर्वीच २१ कोरोनाबाधितांना मृत्यूने गाठल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. उशिरा निदान, अनियंत्रित जुना आजार व रुग्णालयात आणण्यास उशीर हे या मागचे कारण असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, मृतांमध्ये २० ते ५० वयोगटाच्या आतील १२ रुग्ण होते.
कोविड रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याची भीतीही ओसरु लागली आहे. यामुळे लोकांमध्ये बेफिकिरी वाढली आहे. सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लक्षणांना गंभीरतेने घेतले जात नाही. आजार गंभीर झाल्यावर रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असताना एकतर घरीच किंवा वाटेतच मृत्यू होत आहे, म्हणजे 'ब्रॉड डेड' होत आहे. मेडिकलमध्ये १३ ते १९ ऑक्टोबर या सात दिवसात तीन महिलेसह १८ पुरुष 'ब्रॉड डेड' आले आहेत. यात तरुण रुग्णांची संख्या मोठी आहे.
अडीच महिन्यात २३९ 'ब्रॉड डेड' प्रकरण
प्राप्त माहितीनुसार, मेडिकलमध्ये मागील अडीच महिन्यात जवळपास २३९ ह्यब्रॉड डेडह्ण प्रकरण सामोर आली आहेत. यात ऑगस्ट महिन्यात ४६७ रुग्णांमधून सुमारे ८२, सप्टेंबर महिन्यात ५५३ मृतांमधून ११७ तर ऑक्टोबर महिन्यातील मागील १८ दिवसात १५० मृतांमधून साधारण ४० प्रकरणे आहेत.
१६ मृत नागपूर जिल्ह्यातील
मेडिकलमध्ये १३ ऑक्टोबर रोजी चार, १४ ऑक्टोबर रोजी दोन, १५ ऑक्टोबर रोजी पाच, १६ ऑक्टोबर रोजी ४, १७ ऑक्टोबर रोजी ३, १८ ऑक्टोबर रोजी १ तर १९ ऑक्टोबर रोजी २ रुग्ण मृत अवस्थेत (ब्रॉड डेड) आले. यात नागपूर जिल्ह्यातील १६ आहेत. शिवाय, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक आहे. तर मध्य प्रदेशातील तीन मृत आहेत. या सर्वांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह होती.
वेळेत निदान व रुग्णालयात पोहचणे आवश्यक
लक्षणांकडे दुर्लक्ष करणे, आजार अंगावर काढणे, वेळेत निदान न होणे व रुग्णालयात उशिरा आणणे हे 'कोविड ब्रॉड डेड' प्रकरणातील काही कारणे असू शकतात. यात आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जुन्या अनियंत्रित आजाराकडे दुर्लक्ष. यामुळे लक्षणे दिसताच वेळेत निदान करून उपचार घेणे आवश्यक आहे.
-डॉ. प्रशांत पाटील
प्राध्यापक, मेडिसीन विभाग, मेडिकल