परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ३०० पर्यंत वाढवा, सम्यक विद्यार्थी आंदोलन
By आनंद डेकाटे | Published: August 5, 2023 04:59 PM2023-08-05T16:59:15+5:302023-08-05T17:06:53+5:30
संविधान चौकात निदर्शने
नागपूर : राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या ७५ वरून ३०० पर्यंत वाढवण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी सम्यक विद्यार्थीआंदोलनातर्फे संविधान चौकात निदर्शने करण्यात आली.
राज्य शासनातर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बाहेर देशात शिक्षण घेता यावे करिता प्रत्येक वर्षी छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक वर्षी फक्त ७५ विद्यार्थ्यांना देण्यात येते. जवळपास १३ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या १२ टक्के म्हणजेच जवळपास १.५ कोटी इतकी आहे. त्यानुसार शिष्यवृत्ती करिता असलेली विद्यार्थी संख्या फारच कमी आहे.
अनुसूचित जाती मधील अनेक गुणवान व होतकरू विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगतात. परंतु आर्थिक परिस्थिति नसल्यामुळे अनुसूचित जाती चे गुणवंत विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षाणापासून वंचित राहतात. त्यामुळे ही संख्या किमान ३०० पर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले.
आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष रवी शेंडे व समता सैनिक दलाचे अनिकेत कुत्तरमारे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे अथांग कोरडे ,धम्मदीप लोखंडे अनिकेत मेश्राम ,रोहित भगत ,रोहित डोंगडे ,मंथन गजभिये, अक्षय खोब्रागडे, रक्षक पाटिल, रसिका,ग्रीष्मा नरनवरे ,संकेत ढोणे,प्राजक्ता सुखदेवे, रशिका, क्षितिज मेश्राम, दिपांकर कांबळे आदी सहभागी झाले होते.