नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:06 AM2021-06-18T04:06:53+5:302021-06-18T04:06:53+5:30
नागपूर : लॉकडाऊननंतर परिस्थिती सुधारत असल्याचे दृश्य मेट्रोच्या प्रवासी संख्येत होणाऱ्या वाढीमुळे अनुभवायला मिळत आहे. कोविड-पूर्व काळात म्हणजेच ...
नागपूर : लॉकडाऊननंतर परिस्थिती सुधारत असल्याचे दृश्य मेट्रोच्या प्रवासी संख्येत होणाऱ्या वाढीमुळे अनुभवायला मिळत आहे. कोविड-पूर्व काळात म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जेवढे लोक प्रवास करीत होते, तेवढ्याच प्रवाशांची संख्या आता आहे. २६ जानेवारीला ५६ हजार नागपूरकरांनी प्रवास केला होता, हे विशेष. फेब्रुवारी महिन्यात कामाच्या दिवसात हाच आकडा २० हजारांपलीकडे गेला होता.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो रेल्वे आणि स्थानकांचे सातत्याने होणारे निर्जंतुकीकरण आणि जास्त वापर होणाऱ्या भागांच्या स्वच्छतेवर जास्त भर दिला जात आहे. स्टेशनवर प्रवाशांच्या जास्त संपर्कात येणारे कर्मचारी मास्क आणि हातमोजे परिधान करून असतात. प्रवासी भाडे डिजिटल पद्धती देण्यावर भर आहे. रोखीने तिकीट घेतल्यानंतर नोटांचे अल्ट्रा व्हॉयलेट किरणांच्या माध्यमाने निर्जंतुकीकरण केले जाते. केंद्र आणि राज्य सरकारने जारी केल्या सूचना आणि इतर माहिती प्रवाशांना दिली जाते. या संबंधीच्या घोषणा स्टेशनवर आणि गाडीत सातत्याने केल्या जातात.
मिहानमध्ये कार्यरत रितेश बग्गा सुभाषनगर ते खापरीपर्यंत नियमित प्रवास करतात. मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ आणि भाड्यावर येणारा खर्च आता कमी झाला आहे. मेट्रोचा प्रवास सुरक्षित आहे. वैशाली मेश्राम म्हणाल्या, न्यू एअरपोर्ट ते झाशी राणी चौक मेट्रो स्टेशनदरम्यान रोज प्रवास करतो. वेळ आणि भाडे वाचते. मेट्रोने प्रवास पूर्णपणे सुरक्षित आहे.