चाचण्यांसह जिल्ह्यातील रुग्णसंख्येत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:17+5:302021-06-17T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याचे चित्र आहे. परंतु बुधवारी मंगळवारच्या तुलनेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आल्याचे चित्र आहे. परंतु बुधवारी मंगळवारच्या तुलनेत चाचण्या व बाधितांचा आकडा वाढला. २४ तासात जिल्ह्यात ८४ पॉझिटिव्ह आढळले तर तिघांचा मृत्यू झाला. ग्रामीणमध्ये सलग चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनातून मुक्ती मिळवायची असेल तर नागरिकांनी काळजी घ्यायलाच हवी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
बुधवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार नागपूर शहरात ४९ तर ग्रामीण भागात ३५ नवे बाधित आढळले. शहरातील एका रुग्णाचा तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी चाचण्यांमध्येदेखील वाढ झाली. २४ तासात जिल्ह्यामध्ये १० हजार ४०६ चाचण्या झाल्या. त्यातील ८ हजार १९८ शहरात तर २ हजार २०८ ग्रामीण भागात झाल्या.
सक्रिय रुग्णसंख्या १४०० च्या खाली
अनेक आठवड्यानंतर जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १४०० हून खाली आली आहे. बुधवारी जिल्ह्यातील २७९ कोरोनाबाधित ठीक झाले. त्यातील २३१ शहरातील होते. सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये १ हजार ३३६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १ हजार १८९ शहरातील तर १४७ ग्रामीणमधील आहेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयात ३५३ रुग्ण उपचार घेत असून, ९८३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
कोरोनाची बुधवारची स्थिती
दैनिक चाचण्या : १०,४०६
शहर : ४९ रुग्ण व १ मृत्यू
ग्रामीण : ३५ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,७६,५७७
एकूण सक्रिय रुग्ण : १,३३६
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६६,२२८
एकूण मृत्यू : ९,०१३