ऑक्सिजन निर्मिती वाढवा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 09:14 PM2020-09-08T21:14:14+5:302020-09-08T21:15:52+5:30
जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये पुरवठाधारकांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय यांचे अधिष्ठाता, जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयासह ३२ खासगी रुग्णालयांना डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी या तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम यानुसार या काळामध्ये जिल्ह्यांमध्ये कमाल मर्यादेपर्यंत ऑक्सिजनची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यापैकी केवळ ८० टक्के ऑक्सिजन हा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात यावा. तसेच २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले.
वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी ठेवणार नियंत्रण
या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांच्याकडे हे अधिकारी दररोज यासंदर्भातील अहवाल देणार आहेत. नागपूर जिल्ह्यात आठ कंपन्या ऑक्सिजन तयार करतात. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात द्रव ऑक्सिजनची (लिक्विड ऑक्सिजन) आवश्यकता असते. निर्मिती करणाºया आठही पुरवठादारांना यावेळी निमंत्रित करण्यात आले होते.