नागपुरात ‘पासपोर्ट’च्या मागणीत वाढ : तीन वर्षात साडेतीन लाखांहून अधिक अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:58 PM2019-06-07T23:58:26+5:302019-06-07T23:59:41+5:30
उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘पासपोर्ट’साठी साडेतीन लाखांहून अधिक अर्ज आले तर ‘पासपोर्ट’साठी असलेल्या निर्धारित शुल्कातून सुमारे ५२ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील नागरिकांमध्ये ‘पासपोर्ट’ काढण्यासंदर्भात जागरुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत ‘पासपोर्ट’साठी साडेतीन लाखांहून अधिक अर्ज आले तर ‘पासपोर्ट’साठी असलेल्या निर्धारित शुल्कातून सुमारे ५२ कोटी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर येथील ‘पासपोर्ट’ कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. १ एप्रिल २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत ‘पासपोर्ट’साठी आलेले अर्ज, प्रत्यक्ष जारी करण्यात आलेले ‘पासपोर्ट’, शुल्कातून प्राप्त झालेला महसूल इत्यादींबाबत विचारणा केली होती. यासंदर्भात ‘पासपोर्ट’ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०१६ ते २०१८ या कालावधीत ३ लाख ५६ हजार ८२ लोकांनी ‘पासपोर्ट’साठी अर्ज केले. या तीन वर्षांतील व अगोदरचे प्रलंबित अर्ज असे मिळून या काळात ३ लाख ६२ हजार १३३ ‘पासपोर्ट’ जारी करण्यात आले. विविध कारणांमुळे केवळ दोन अर्ज रद्द करण्यात आले.
तीन वर्षांत २ हजार ९२६ ‘पासपोर्ट’ दिलेल्या पत्त्यावर पोहोचू शकले नाहीत तर ८२ हजार १९१ ‘पासपोर्ट’ निलंबित करण्यात आले. ‘पासपोर्ट’ शुल्कातून ५२ कोटी ९० लाख १० हजार ७९० रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
२०१३ मध्ये आले होते ८१ हजार अर्ज
२०१३ पासून अर्ज व प्रत्यक्ष जारी झालेले ‘पासपोर्ट’ यांच्या संख्येतदेखील सातत्याने वाढ होत आहे. २०१३ मध्ये ८१ हजार ४७१ अर्ज प्राप्त झाले होते व ७५ हजार ५७१ ‘पासपोर्ट’ जारी झाले होते. २०१४ मध्ये ९९ हजार २३७ अर्ज प्राप्त झाले व ९१ हजार ५०८ ‘पासपोर्ट’ जारी झाले. २०१५ मध्ये १ लाख १४ हजार ६४० अर्ज आले व १ लाख १४ हजार ९४९ अर्जदारांचे ‘पासपोर्ट’ जारी झाले होते.
वर्षनिहाय ‘पासपोर्ट’ची आकडेवारी
वर्ष प्राप्त अर्ज जारी
२०१३ ८१,४७१ ७५,५७१
२०१४ ९९,२३७ ९१,५०८
२०१५ १,१४,६४० १,१४,९४९
२०१६ १,१८,१२४ १,२०,१४०
२०१७ १,२०,३४९ १,२२,३६६
२०१८ १,१७,६०९ १,१९,६२७
एका दिवसात जारी होतो तत्काल ‘पासपोर्ट’
‘पासपोर्ट’संबंधात सर्व प्रक्रिया झाल्यानंतर २०१८ साली सर्वसाधारण ‘पासपोर्ट’ ६.३८ दिवसांत जारी झाले. २०१६ मध्ये हाच आकडा ३.०९ इतका होता. तर २०१५ मध्ये सरासरी ४.१५ दिवस लागले होते. २०१८ मध्ये तत्काल ‘पासपोर्ट’ जारी व्हायला सरासरी १.०८ दिवस लागले. २०१६ मध्ये १.८९ तर २०१७ मध्ये १.०३ दिवस लागले होते.