आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमधील रुग्णात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:46 PM2020-07-11T20:46:55+5:302020-07-11T20:51:58+5:30
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने व ८० टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने पुढील उपचारासाठी मेयो, मेडिकल व एम्समधून मोठ्या संख्येत रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. सुरुवातीला १५० खाटांमध्ये सुरू केलेले हे सेंटर १८० वर रुग्ण जाताच ३०० खाटांचे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वाढती रुग्णसंख्या पाहता या खाटाही कमी पडण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने व ८० टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नसल्याने पुढील उपचारासाठी मेयो, मेडिकल व एम्समधून मोठ्या संख्येत रुग्ण आमदार निवासातील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. सुरुवातीला १५० खाटांमध्ये सुरू केलेले हे सेंटर १८० वर रुग्ण जाताच ३०० खाटांचे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, वाढती रुग्णसंख्या पाहता या खाटाही कमी पडण्याची शक्यता आहे.
कोरोनाची मध्यम व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी नागपुरात मेयो व मेडिकलमध्ये प्रत्येकी ६०० खाटांचे ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ तयार करण्यात आले. मात्र गेल्या आठवड्यापर्यंत नागपुरात कोविड केअर सेंटर नव्हते. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड हॉस्पिटलच्या ‘एचडीयू’ व ‘आयसीयू’मध्ये ठेवले जात होते. अशा रुग्णांवर विशेष उपचाराची गरज तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळ खर्ची होत होता. अखेर गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आमदार निवासाला कोविड केअर सेंटर करण्याचा निर्णय घेतला. ५ जुलैच्या रात्रीपासून मेयो, मेडिकल व एम्समधील रुग्णांना येथे भरती करणे सुरू झाले. सुरुवातीला ‘बी’ इमारतीत १५० वर खाटांची सोय करण्यात आली होती. परंतु पाच दिवसात या खाटा फुल्ल झाल्याने व ‘ए’ इमारतीमध्ये बांधकाम सुरू असल्याने ‘सी’ इमारतीत रुग्णांना ठेवले जात आहे. सध्या दोन्ही इमारती मिळून साधारण ३०० वर खाटांची सोय केली आहे. परंतु कोरोनाबाधित त्यातही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने या खाटा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गरज पडल्यास क्वारंटाईन सेंटर होणार कोविड केअर सेंटर
नागपूर जिल्ह्यात ८० ते ८५ टक्क्यांवर रुग्णांना लक्षणे नाहीत. यामुळे भविष्यात जास्तीत जास्त कोविड केअर सेंटरची गरज पडणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांना याबाबत विचारल्यावर त्यांनी गरज पडल्यास क्वारंटाईन सेंटरला कोविड केअर सेंटर केले जाईल, अशी माहिती दिली.