नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘मेलिओआयडोसिस’च्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 10:56 AM2020-11-11T10:56:19+5:302020-11-11T10:58:04+5:30
‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले असलेतरी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण कायम आहे. यातच या आजाराची लक्षणे असलेला ‘मेलिओआयडोसिस’ आजाराचे रुग्ण विशेषत: ग्रामीण भागात वाढायला लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. एका खासगी इस्पितळात मागील तीन महिन्यात १० ते १२ रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या आजारात साधारण १५ ते अडीच महिन्यापर्यंत ताप राहतो. सोबतच सांधेदुखी, डोकेदुखी, दम लागणे, खोकला येणे, पायाच्या हाडांमध्ये पस जमा होणे आदी लक्षणे दिसून येतात.
‘मेलिओआयडोसिस’ या आजाराबद्दल ग्रामीण भागातील काही डॉक्टरांना विशेष माहिती नाही. यामुळे सामान्य औषधी देऊनही रुग्ण बरा होत नसल्याने त्याना नागपुरात पाठविले जात आहे. त्यांच्या लक्षणावरून व रक्ताच्या चाचण्यावरून या आजाराचे निदान होत आहे. आतापर्यंत या आजाराचे रुग्ण ब्रह्मपुरी चंद्रपूर, दिग्रस दारव्हा, अकोला, मूर्तिजापूर आणि विदर्भाच्या काही भागात आढळून आले आहेत. मागील तीन ते चार महिन्यात या आजाराचा रुग्णात वाढ झाली आहे, अशी माहिती संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. नितीन शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, वर्षाला या आजाराचे तीन ते पाच रुग्ण आढळून यायचे. साधारण ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात हे रुग्ण दिसून यायचे. परंतु या वर्षी रुग्णांची संख्या वाढल्याने खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे.
जीवाणूमुळे पसरणारा आजार
कोरोना हा विषाणूपासून पसरतो मात्र ‘मेलिओआयडोसिस’ हा आजार जीवाणूपासून पसरतो. गढूळ पाणी, धुळीमध्ये हा टिकून राहतो. हे पाणी प्राशन केल्यास किंवा धुळीतून श्वसनाद्वारे जीवाणू शरीराच्या आत जातो. प्राण्यांमधून हा आजार मनुष्यालाही होऊ शकतो.
निदान उशिरा होण्याचे प्रमाण मोठे
या आजाराचे सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात आढळून येतात. या भागातील फार कमी डॉक्टरांना या आजाराविषयी माहिती आहे. परिणामी, आजाराचे लवकर निदान होत नसल्याने मृत्यूचा धोका संभावतो.
१० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका
‘मेलिओआयडोसिस’वर औषध उपलब्ध आहेत. परंतु लवकर निदान होणे आवश्यक आहे. उशिरा निदानामुळे १० पैकी ९ रुग्णांना मृत्यूचा धोका असतो. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
-डॉ. नितीन शिंदे
विशेषज्ञ, संसर्गजन्य आजार