ग्रामीण भागात लसीकरणाचा टक्का वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:09 AM2021-05-08T04:09:52+5:302021-05-08T04:09:52+5:30
कोंढाळी : कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी अधिक पुढाकार घ्यावा. ...
कोंढाळी : कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी अधिक पुढाकार घ्यावा. यासाठी पोलीस व महसूल विभागाची मदत घ्यावी, असे आवाहन माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी केले.
कोंढाळी परिसरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबत देशमुख यांनी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेतला. तहसीलदार अजय चरडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शशांत व्यवहारे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर कोल्हे, ठाणेदार विश्वास फुल्लरवार, कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाळके, डॉ. सुहास मोरे, कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास आदी उपस्थित होते.
ग्रामविकास अधिकारी दिलीपसिंह राठोड यांनी कोंढाळी गावात कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती बैठकीदरम्यान दिली. ग्रामीण भागात लसीकरण करण्याबाबत जनजागृती करूनही कमी प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णाच्या उपचाराकरिता पुरेसा औषधसाठा व ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध आहेत. पण कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात अन्य आजाराचे रुग्ण व प्रसूतीकरिता महिला येत असल्याने येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध केले तरी कोरोना रुग्णावर उपचार शक्य होणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.जयश्री वाळके यांनी दिली. आरोग्य केंद्रातील बहुतांश पल्स ऑक्सिमीटरमध्ये बिघाड झाला असल्याचे वाळके यांनी अवगत केले. देशमुख यांनी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राला तातडीने पल्स ऑक्सिमीटर व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. या केंद्रात तातडीने सात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व तीन ईसीजी मशीन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. सरपंच केशव धुर्वे व उपसरपंच स्वप्नील व्यास यांनी कोंढाळी ग्रामीण रुग्णालयाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण व्हावे याकडे देशमुख यांचे लक्ष वेधले.