मोक्षप्राप्तीसाठी पुण्य वाढवा
By admin | Published: November 16, 2014 12:47 AM2014-11-16T00:47:07+5:302014-11-16T00:47:07+5:30
जीवनात केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब मृत्यूनंतर ईश्वराला द्यावा लागतो. जीवनात पाप अधिक घडले असेल तर मोक्ष मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक जीवात्म्याने आपल्या जीवनात पुण्याचे ‘अकाऊंट बॅलेंस’
स्वामी विष्णुस्वरूपानंद सरस्वती : सप्तक आणि काळे फाऊंडेशन ट्रस्टचा उपक्रम
नागपूर : जीवनात केलेल्या पाप-पुण्याचा हिशेब मृत्यूनंतर ईश्वराला द्यावा लागतो. जीवनात पाप अधिक घडले असेल तर मोक्ष मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक जीवात्म्याने आपल्या जीवनात पुण्याचे ‘अकाऊंट बॅलेंस’ वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी विष्णुस्वरूपानंद सरस्वतीजी यांनी आज येथे केले.
सप्तक आणि काळे फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित ‘गजेंद्र मोक्ष’ (श्रीमद्भागवत कथेवर आधारित ईश्वर प्राप्तीचा मंत्र) या विषयावर ते बोलत होते. स्वामी विष्णुस्वरूपानंद सरस्वती म्हणाले, संसारात दु:ख नसलेला कुणीच नाही. प्रत्येक जीव पीडित आहे. त्यामुळे तो दु:खापासून निवृत्तीची साधने शोधतो. दु:खापासून मुक्ती म्हणजे मोक्ष होय. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हवा असणारा भक्त अर्थार्थी असतो. असे भक्त संकट आले की ईश्वराचे स्मरण करतात. द्रोपदीही त्यातील एक आहे. त्रिकुटाचल पर्वतातील गजेंद्र नावाच्या हत्तीत १० हजार हत्तींचे बळ होते. जलक्रीडा करताना त्याला मगरीने पकडल्यानंतर त्याने ईश्वराचे स्मरण केले. ईश्वराला जाब देण्यासाठी संसारातील भोगावर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे. ईश्वराने इंद्रियाला निरोगी बनविण्यासाठी बनविले. माणूस शरीराला विषारी बनवत आहे. संसारात परिवर्तन न होणारी कोणतीही वस्तू नाही. मृत्यू म्हणजे दृश्यापासून अदृश्य होणे होय. मृत्यूनंतर पुन्हा जन्म मिळत असल्याने प्रत्येकजण मृत्यूकडे जातो.
जीवन भक्तिमय करण्यासाठी विलंब करू नका. माणसाचा अहंकार त्याला कुणापुढे वाकू देत नाही. चार पुरुषार्थापैकी धर्म, अर्थ, काम हे अनित्य तर मोक्ष हा नित्य आहे. प्रत्येकाने मृत्यूची तयारी करणे गरजेचे आहे. संसारात विवेक जागविण्यासाठी जीवात्म्याला एकटे ठेवा. या जन्मात केलेले कर्म पुढील जन्मात कामाला येतात. पुण्य, पापाशिवाय अखेर कुणीच सोबत येत नाही. प्रत्येकाला ईश्वराचा आधार हवा आहे. आधार नसल्यास निराधार जीव भटकतो. त्यामुळे गजेंद्रने ईश्वराला अखेरच्या क्षणी पुष्प समर्पित करून अविद्यारूपी शरीरापासून मुक्तीची मागणी केली.
सुमनाप्रमाणे मनही एक पुष्प आहे ते सुद्धा ईश्वराला देण्याची गरज आहे. सध्या जीवनात जे मिळते ते पूर्वीच्या जन्मातील पुण्यामुळे मिळते. भागवत कथेमुळे मानसाचे जीवन दिव्य होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनुराधा मुंडले यांनी स्वामीजींचे स्वागत केले. प्रास्ताविक कुमार काळे यानी केले. व्याख्यानाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)