नागपूर विभागातील जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 11:02 AM2020-08-10T11:02:17+5:302020-08-10T11:02:42+5:30
नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसापासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पूर्व विदर्भात चांगला पाऊस होत आहे. परिणामी धरणातील पाणीसाठाही वाढला आहे. चंद्रपुरातील असोलामेंढा धरण १०० टक्के भरले आहे. तर वर्धा जिल्ह्यातील धाम ९०.९७ टक्के भरले आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह ८८.७९ व कामठी खैरी धरण ९०.६३ टक्के भरले आहे. तसेच गोसेखुर्द प्रकल्पही ५३.८ टक्के भरला आहे.
नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प (धरण) आहेत. त्याची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५२.८९ दलघमी इतकी आहे. यात ८ आॅगस्टपर्यंत २२४४ दलघमी म्हणजे ६०.२३ टक्के इतके पाणी जमा झाले आहे. जिल्हानिहाय धरणातील पाणीसाठ्याचा विचार केल्यास वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा ७३.२७ टक्के, बोर ७१.७७ टक्के, पोथरा ३९.४३ टक्के भरले. नागपूर जिल्ह्यातील रामटेक खिंडसी २५.२८ टक्के, नांद वणा ३३.५५ आणि वडगाव ६५.८९ टक्के भरले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह २४.३९ टक्के, सिरपूर २४.९ टक्के, पुजारीटोला १५.२१ टक्के आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ हे २७.८८ टक्के भरले आहे. गडचिरोलीतील दिना प्रकल्प ३०.६३ टक्के भरले. भंडारा जिल्ह्यातील बावनथडी ३४.६६ टक्के भरले आहे.
अनेक धरणाचे गेट उघडावे लागले
विभागातील अनेक धरणाचे दरवाजे उघडावे लागले. गोसेखुर्दचे ९ गेट उघडल्या गेले. धापेवाडा बॅरेजचे ५, लोअर वर्धाचे २ गेट उघडल्या गेले.
मध्यम व लघु प्रकल्पांचीही स्थिती उत्तम
नागपूर विभागात एकूण ४० मध्यम स्वरूपातील प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठा क्षमता ५३६.४८ दलघमी इतकी आहे. यामध्ये सध्या २७५.२३ दलघमी म्हणजे ५१.३० टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. लघु प्रकल्पही ५० टक्केवर भरली आहेत.