महिलांमध्ये वाढले दारू, तंबाखूचे व्यसन; नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 11:08 AM2020-12-21T11:08:13+5:302020-12-21T11:08:46+5:30
Nagpur News नागपूर जिल्ह्यात महिलांमध्ये सिगारेट-तंबाखू व्यसनाचे प्रमाण ५ टक्के, तर दारूच्या व्यसनाचे प्रमाण ०.४ टक्के आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधीनता हा केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत आहे. यातही महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रात ५.८ टक्के महिलांना सिगारेट-तंबाखूचे, तर ०.२ टक्के महिलांना दारूचे व्यसन होते. २०१९-२० मध्ये याचे प्रमाण वाढले. महिलांमध्ये सिगारेट-तंबाखू व्यसनाचे प्रमाण १०.९ टक्के तर दारूच्या व्यसनाचे प्रमाण वाढून ते ०.४ टक्क्यावर गेले आहे.
पूर्वी चित्रपटात, नंतर टीव्ही मालिकेत आणि आता सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या ‘वेबसिरिज’मध्ये मुली-महिला दारू पिताना, व्यसन करताना सर्रास दाखविले जात आहे. व्यसनाच्या या उदात्तीकरणामुळे चहाच्या टपरीवरही मुली सिगारेट ओढताना आणि कारमध्ये बसून किंवा निवांत ठिकाणी कारच्या बोनेटवर दारूची बॉटल ठेवून पॅग रिचविताना दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे समाजानेही त्याचा स्वीकार केल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या मते, व्यसनाची ही ओढ आई-वडिलांकडून, मित्र-मैत्रिणींकडून वाढते. एकंदरच महिलांना व्यसन लागले की त्यात वाहवत जाण्याची प्रवृत्ती अधिक असते.
‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’ हा दर तीन वर्षांनी होतो. मागील वर्षी पहिल्यांदाच जिल्हानिहाय महिला आणि पुरुषांमधील तंबाखू व दारूच्या व्यसनाचे सर्वेक्षण करण्यात आले.
- महिला-पुरुषांमध्ये सिगारेट तंबाखूचे व्यसन
२०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार सिगारेट-तंबाखू व्यसनाचे प्रमाण शहरातील महिलांमध्ये ४.२ टक्के, ग्रामीणमध्ये ७.४ टक्के असे एकूण ५.८ टक्के होते. तर, शहरातील पुरुषांमध्ये ३३.९ टक्के, ग्रामीणमध्ये ३९.३ टक्के असे एकूण ३६.५ टक्के होते. २०१९-२० च्या सर्वेक्षणानुसार शहरातील महिलांमध्ये ६.६ टक्के, ग्रामीणमध्ये १४.७ टक्के असे एकूण १०.९ टक्के आहे. तर शहरातील पुरुषांमध्ये २६.२ टक्के, ग्रामीणमध्ये ४०.६ टक्के असे एकूण ३३.८ टक्के आहे.
- महिला-पुरुषांमधील दारूच्या व्यसनाचे प्रमाण
२०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार, शहरातील महिलांमध्ये दारूच्या व्यसनाचे प्रमाण शहरामध्ये ०.२ टक्के, ग्रामीणमध्येही ०.२ टक्के असे एकूण ०.२ टक्के होते. शहरामधील पुरुषांमध्ये हे प्रमाण २२.८ टक्के, ग्रामीणमध्ये १८.० टक्के असे एकूण २०.५ टक्के होते. २०१९-२० च्या सर्वेक्षणानुसार, शहरातील महिलांमध्ये ०.३ टक्के, ग्रामीणमध्ये ०.५ टक्के असे एकूण ०.४ टक्क्यांवर पोहचले. तर, शहरातील पुरुषांमध्ये १३ टक्के, ग्रामीणमध्ये १४.७ टक्के असे एकूण १३.९ टक्के झाले आहे.
- नागपूर जिल्ह्यात महिलांमध्ये दारू व्यसनाचे प्रमाण ०.४ टक्के
२०१९-२० च्या सर्वेक्षणानुसार, नागपूर जिल्ह्यातील महिलांमध्ये तंबाखूच्या व्यसनाचे प्रमाण ५ टक्के आहे. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ४०.२ टक्के आहे. तर महिलांमध्ये दारूच्या व्यसनाचे प्रमाण ०.४ टक्के आहे