Corona Virus; ५० मधून १० मुलांमध्ये वाढल्या अॅण्टिबॉडीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 10:42 AM2021-06-08T10:42:41+5:302021-06-08T10:44:07+5:30
Nagpur News १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अॅण्टिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. लहान मुलांमध्ये अॅण्टिबॉडीज विकसित कशी होईल, यासंदर्भात विविध पातळ्यांवर संशोधन सुरू असून लसीकरणाच्या चाचणीलादेखील सुुरुवात झाली आहे. सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत असताना नागपूर शहरातील पालकांसाठी एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. १२ ते १८ वयोगटातील ५० मधून १० मुलांच्या शरीरात प्रतिपिंडाची (अॅण्टिबॉडी) निर्मिती झाल्याचे आढळून आले आहे. लसीकरणाअगोदरच २० टक्के मुलांमध्ये अॅण्टिबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास व्हावा, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
लहान मुलांवरील लसीकरणासाठी राज्यात पहिल्यांदाच नागपुरात बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या पुढाकारात २ ते १८ या वयोगटात कोव्हॅक्सिन लसीच्या मानवी चाचणीला ६ जूनपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवरील चाचणीसाठी ५० सुदृढ मुलांची निवड करण्यात आली. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता, १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले. यामुळे डॉक्टरांच्या पथकालाही आश्चर्य वाटले. प्राप्त माहितीनुसार, निवड झालेली मुले सुखवस्तू घरातील आहेत. त्यांच्या घरातील जवळच्या व्यक्तीला संसर्ग झालेला नाही. शिवाय, मागील दोन महिन्यांत मुलांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. त्यानंतरही त्यांच्या शरीरात अॅण्टिबॉडीज वाढल्या आहेत.
- झोपडपट्टीतील लोकांमध्ये वाढल्या अॅण्टिबॉडीज
विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या पुढाकाराने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ‘पीएसएम’ विभागाच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये सिरो सर्वेक्षण करण्यात आले. यात शहरातील ४९.७ टक्के, तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अॅण्टिबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले होते. विशेषत: झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये ॲण्टिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहतीत राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट होते.
- मुलांमध्ये वाढलेल्या अॅण्टिबॉडीजचा अभ्यास होणे महत्त्वाचे
लहान मुलांवरील मानवी चाचणीत ५० मधून १० मुलांमध्ये ॲण्टिबॉडीज वाढल्याचे दिसून आले आहे. ही एक मोठी संख्या आहे. यामुळे याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. यांना त्यांच्या नातेवाइकांकडून, किंवा इतर मुलांकडून लागण झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. लहान मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती मोठ्यांच्या तुलनेत अधिक प्रबळ असते. यामुळे कोरोनाची मध्यम व गंभीर लक्षणे फार कमी प्रमाणात दिसून येतात.
-डॉ. वसंत खळतकर, बालरोगतज्ज्ञ