पावसाळ्यात वाढले दम्याचे आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:45+5:302021-07-26T04:07:45+5:30
नागपूर: पावसाळ्यातील वातावरणामुळे वाढलेले बुरशीचे आजार, अॅलर्जीचा धोका व व्हायरल इन्फेक्शनमुळे अस्थमा म्हणजे दम्याचा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.दमा ...
नागपूर: पावसाळ्यातील वातावरणामुळे वाढलेले बुरशीचे आजार, अॅलर्जीचा धोका व व्हायरल इन्फेक्शनमुळे अस्थमा म्हणजे दम्याचा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.दमा नियंत्रित ठेवण्याकडे दुर्लक्ष झाल्यास ‘अटॅक’ येण्याचा धोका वाढला आहे. यामुळे पावसाळ्यात अस्थामाचे व्यवस्थापन करा, असा सल्ला श्वसनविकार तज्ज्ञानी दिला आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असलीतरी भीतीपोटी अनेक अस्थामाचे रुग्ण रुग्णालयात जाण्यास टाळत असल्याचे चित्र आहे. आजार गंभीर झाल्यावरच ते रुग्णालयात येत असल्याने जीवाच्या धोक्यासोबतच उपचाराचा खर्च वाढत आहे. श्वसनविकार तज्ज्ञ डॉ.विनीत निरंजने, म्हणाले, पावसाळ्यात अस्थामाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. श्वास घेताना छातीतून घरघर आवाज येणे, खोकला आणि श्वास लागणे ही दम्याची लक्षणे आहे. फुफ्फुसांमधील वायुमामार्गाला सूज आल्याने ही लक्षणे दिसून येतात. यामुळे सामान्यपणे श्वास घेण्यात अडचण येते. परंतु वेळीच उपचार घेतल्यास श्वसननलिका पूर्ववत होते.
-पावसाळ्यात बळावतात दम्याचे आजार -डॉ. निरंजने
आधीपासूनच दम्याचा आजार असलेल्या रुग्णाना पावसाळा कठीण जातो. या वातावरणात बुरशी, धूळ आणि बॅक्टेरियाशी संपर्क आल्यास त्यांचा आजार बळावण्याची शक्यता असते. यामुळे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. पाळीव प्राण्यांमुळे दम्याची लक्षणे आणखी वाढतात. यामुळे त्यांना खोलीबाहेर ठेवा. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या, असा सल्ला डॉ. निरंजने यांनी दिला.
-व्हायरल इन्फेक्शनला दूर ठेवा-डॉ. मेश्राम
मेडिकलच्या श्वसनरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम म्हणाले, पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढलेले असते. अशावेळी दम्याचा रुग्णांना हे इन्फेक्शन झाल्यास दम्याचा अटॅक येण्याची शक्यता वाढते. यामुळे या मोसमात अधिक काळजी घेणे गरजेचे ठरते. दमा नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या पल्मोनोलॉजिस्टचा वेळोवेळी सल्ला घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
-दम्याचा त्रास टाळण्यासाठी हे करा
:: घरातील व बाहेरच्या धूळीपासून दूर रहा
:: अगरबत्ती, धूप स्टिक, डासांपासून बचाव करणारे कॉईल, पर्फ्युम आणि डिओडोरंटचा वापर टाळा.
:: घरातील ओलसर भिंती, फर्निचर तपासून बघा. स्नानगृह व स्वयंपाकघर कोरडे ठेवा. घरात हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करा.
:: पाळीव प्राण्यांना खोलीबाहेर ठेवा
:: बाहेर पडताना मास्कचा वापर करा
:: श्वासोच्छ्वासाचे व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या, घरातील चटई, बेडशीट आणि उशीचे कव्हर गरम पाण्याने धुवा.
:: जंकफुड, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळा