‘आक्रोश’ दडपण्यासाठी गर्दीचे ‘टार्गेट’ वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:53 AM2017-11-02T01:53:02+5:302017-11-02T01:53:15+5:30

काँग्रेसमधील गटबाजी टोकाला गेली असून चंद्रपूरमध्ये ६ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहे.

Increased crowd 'targets' to suppress 'outrage' | ‘आक्रोश’ दडपण्यासाठी गर्दीचे ‘टार्गेट’ वाढविले

‘आक्रोश’ दडपण्यासाठी गर्दीचे ‘टार्गेट’ वाढविले

Next
ठळक मुद्देचंद्रपूरच्या मेळाव्यासाठी तयारी जोरात : चव्हाण समर्थक सरसावले

कमलेश वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसमधील गटबाजी टोकाला गेली असून चंद्रपूरमध्ये ६ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी काँग्रेसचे दोन वेगवेगळे मेळावे होत आहे. माजी खा. नरेश पुगलिया यांनी आयोजित केलेल्या रॅलीत व्यक्त होणारा असंतुष्टांचा ‘आक्रोश’ दडपण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित ‘जनआक्रोश मेळाव्यात’ गर्दी वाढविण्याचे नवे टार्गेट सहाही जिल्ह्यातील नेत्यांना देण्यात आले आहे. यासाठी बैठकांचे सत्र जोरात सुरू असून विशेष टीम कामी लावण्यात आल्या आहेत.
नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या बॅनरखाली शेतकरी व कामगार रॅली आयोजित केली आहे. या रॅलीत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी खा. गेव्ह आवारी, माजी आ. अशोक धवड यांच्यासह काही नेते सहभागी होणार असल्याचा दावा पुगलिया यांनी केला आहे. ही रॅली एक प्रकारे प्रदेश काँग्रेसच्या मेळाव्याला आव्हानच मानली जात आहे. त्यामुळे पुगलियांच्या रॅलीसमोर ‘जनआक्रोश मेळावा’ फिका ठरू नये यासाठी प्रदेश काँग्रेसच्या आयोजक नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशच्या मेळाव्यात जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी अशोक चव्हाण समर्थक नेत्यांना नवे टार्गेट देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून आणण्यात येणाºया लोकांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यासाटी जिल्हानिहाय बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तयारीसाठी भंडारा येथे आज बैठक झाली. बैठकीला सर्व प्रमुख नेते, जि.प. सदस्य, ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते. या वेळी दोन ते अडीच हजार लोकांचे सुधारित टार्गेट देण्यात आले. नागपूर शहरातून दोन हजार लोक आणण्याचे नियोजन होते. त्यातही वाढ करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणमधील उमरेड, कुही, बुटीबोटी, हिंगणा या भागातून अधिकाधिक लोक नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी वर्धा येथे आढावा बैठक होत आहे. गोंदिया व गडचिरोलीच्या बैठका पूर्वीच आटोपल्या असल्या तरी त्यांनाही नव्याने निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकांची गर्दी जमविण्यासाठी चंद्रपूर शहर व ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व नियोजनासाठी नागपूर विभागातील प्रमुख नेत्यांची चमू चंद्रपूर येथे तीन दिवस मुक्कामी असणार आहे.
चंद्रपूरच्या जनआक्रोश मेळाव्याच्या नियोजनासाठी रविवारी रविभवन येथे बैठक झाली होती. तीत माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे आदी उपस्थित होते. या बैठकीत मोघे यांनी माजी खा. नरेश पुगलिया यांच्यासह नाराज असलेल्या जुन्या नेत्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले जावे, अशी सूचना केली होती. मात्र, त्यानंतरही स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पुगलिया व इतर नेते संतप्त झाले, असा दावा पुगलिया समर्थकांकडून केला जात आहे.
आधीच विश्वासात घेतले असते तर आज ही वेळ आली नसती, अशी भूमिका त्यांच्याकडून मांडली जात आहे. वडेट्टीवार यांनी पुगलिया यांचे हे आंदोलन भाजपाचे षड्यंत्र असल्याचा आरोप करीत पुगलिया यांची कुठलीही मनधरणी केली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे चंद्रपूरमध्ये होणाºया दोन वेगवेगळ्या मेळाव्यात काँग्रेसमधील अंतर्गत आक्रोश पहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
चव्हाणांकडून वडेट्टीवारांना निरोप ?
चंद्रपूरमध्ये दोन मेळावे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाची दखल प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. हा वाद थांबविण्यासाठी नमते घेण्याचा निरोप चव्हाण यांच्याकडून वडेट्टीवार यांना देण्यात आला आहे, असा दावा पुगलिया समर्थकांनी केला आहे. मात्र, आयोजक गटाने असा निरोप आल्याचे नाकारले आहे.

Web Title: Increased crowd 'targets' to suppress 'outrage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.