दिवाळीत पर्यटनस्थळांवर वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 09:33 PM2018-11-09T21:33:59+5:302018-11-09T21:35:06+5:30
दिवाळी म्हणजे सुट्यांचा सुकाळ. या दिवसात प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा बेत आखतो. दोन ते तीन दिवसांच्या सुट्या आनंदाने घालविण्यासाठी नागपूरकर आसपासच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. त्यात जंगलसफारी, देवदर्शनाला प्राधान्य देत असल्यामुळे विदर्भातील पर्यटनस्थळांवर आणि धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. नागपूरपासून ६० ते १०० किलोमीटर अंतरावरील एक दिवसीय पर्यटनासाठी नागरिक पसंती देत आहेत. याशिवाय दिवाळीच्या काळात फार्म हाऊसवरील पार्ट्या वाढल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळी म्हणजे सुट्यांचा सुकाळ. या दिवसात प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा बेत आखतो. दोन ते तीन दिवसांच्या सुट्या आनंदाने घालविण्यासाठी नागपूरकर आसपासच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. त्यात जंगलसफारी, देवदर्शनाला प्राधान्य देत असल्यामुळे विदर्भातील पर्यटनस्थळांवर आणि धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे. नागपूरपासून ६० ते १०० किलोमीटर अंतरावरील एक दिवसीय पर्यटनासाठी नागरिक पसंती देत आहेत. याशिवाय दिवाळीच्या काळात फार्म हाऊसवरील पार्ट्या वाढल्या आहेत.
दिवाळीच्या सुट्यात अनेक नागरिकांनी विदर्भातील पर्यटनस्थळांवर गर्दी केल्याचे दिसून येत आहे. दिवाळीत शासकीय कार्यालयांना यंदा पाच दिवसाच्या सुट्या मिळाल्या आहेत. त्यामुळे हे पाच दिवस कुटुंबासह घालविण्यासाठी आधीच नागपूरकरांनी आपले नियोजन केले आहे. यात खिंडसी येथे पर्यटनासाठी नागरिक मोठी गर्दी करीत असून तेथील बोटिंगचा आनंद घेत आहेत. याशिवाय येथे निवासाची व्यवस्था असल्यामुळे मागील पाच दिवसांपासून खिंडसीत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. याशिवाय चिखलदरा, नवेगाव बांध, तोतलाडोह येथेही पर्यटनासाठी गर्दी वाढली आहे. अनेकांनी देव दर्शनासाठी रामटेक येथील गडमंदिर आणि आदासाची निवड केल्यामुळे या धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. याशिवाय वाकी येथील ताजुद्दीन बाबांच्या दर्शनासाठी आणि पारडसिंगा येथील मा अनसूया मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. रविवारपर्यंत धार्मिक आणि पर्यटनस्थळांवरील ही गर्दी कायम राहणार आहे.
जंगल सफारीची क्रेझ
दिवाळीच्या सुट्यात पर्यटनासाठी नागरिकांनी जंगल सफारीसाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. यामुळे पेंच, ताडोबा अभयारण्य येथे मोठ्या संख्येने नागरिक जंगल सफारीचा आनंद घेत आहेत. या पर्यटनस्थळांवर वन विभागाच्या आॅनलाईन बुकिंगला पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. तर अनेकजण मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्याला भेट देत आहेत.
फार्म हाऊसवर वाढल्या पार्ट्या
दिवाळीत नागपूरशेजारील फार्म हाऊसवर मोठ्या प्रमाणात पार्ट्या वाढल्या आहेत. अनेकजण बालगोपाल, कुटुंबीयांसह फार्म हाऊसवर गर्दी करीत आहेत. एक दिवसीय पर्यटनासाठी कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत पार्ट्यांचा बेत आखल्या जात आहे. तर मित्रांचे ग्रुपही मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसवर पार्टी करण्यासाठी जात आहेत.