दहीहंडीत सुरक्षेवर देणार जास्त भर; थरावर थर पण नियमांचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:00 AM2019-08-22T06:00:00+5:302019-08-22T06:00:07+5:30
विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणित करण्यात येत असला तरी, थरावर थर चढवून विक्रम करण्याच्या नादात अनेक गोविंदा उंचावरून पडून जखमी झाले आहेत. सुरक्षेचे अनेक नियम असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने गेल्या तीन वर्षांत नागपुरात पाच गोविंदा जायबंदी झाले आहेत. सुदैवाने गेल्या काही वर्षांत जीवितहानी झालेली नाही. दहीहंडी करा परंतु दुर्घटना टाळण्यासाठी नियम पाळा, असे सांगण्याची वेळ आली आहे.
दहीहंडी फोडण्याचा वेगळा उत्साह तरुणाईत जास्त दिसून येतो. विदर्भात अन्य शहरांच्या तुलनेत नागपुरात लहान-मोठी ३० पेक्षा जास्त मंडळे आहेत. या सर्व मंडळातर्फे दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात येते. दहीहंडी फोडण्यापेक्षा थरावर थर लावण्याची मोठी स्पर्धा असते. पथक या उंचीवर न पोहोचल्यास थर कमी करण्यात येतो. प्रारंभी सर्वात उंच थरासाठी लाखो रुपयांचे बक्षीस होते. थर जसजसे कमी होतात, तशीतशी बक्षिसांची रक्कमही कमी होते. या उत्सवामुळे स्थानिक युवक सक्रिय होतात. वरच्या थरावरून गोविंदा पथकातून कुणी खाली पडला तर सुरक्षेच्या सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे गोविंदाला इजा होत नाही. प्रसंगी उपचारासाठी डॉक्टर्स आणि अॅम्ब्युलन्स असते. इतवारीतील गोपिकांच्या दहीहंडीसाठी थर कमी असतो. सुरक्षा व्यवस्था तगडी असते. गोपिकांच्या पथकांना उपस्थितांकडून प्रोत्साहन दिले जाते. नागपुरात दहीहंडी उत्सवाची जवळपास ५० वर्षांची परंपरा आहे. काही मंडळांनी सुरक्षेच्या कारणांनी दहीहंडी बंद केली असली तरीही, अनेक मंडळातील तरुणांनी यंदा दहीहंडी उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सुरक्षेबाबत दक्षता घेतली जाणार आहे.
नागपूरची परंपरा उत्सवाची राहिली आहे. येथे सर्व धर्माचे लोक मिळून उत्सव साजरे करतात. ही परंपरा कायम राहावी. स्वत:ची आणि इतरांची सुरक्षा सांभाळून दहीहंडीचा उत्सव साजरा करा. धोका पत्करू नका आणि कुणालाही धोका निर्माण होईल, असे वागू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका.
- डॉ. भूषणकुमार उपाध्यक्ष, पोलीस आयुक्त, नागपूर शहर.
नागपुरात सहा वर्षांपासून गोपिकांच्या दहीहंडी उत्सवाने वेगळी परंपरा सुरू केली आहे. अर्थात, हा साहसी क्रीडा प्रकार असून त्यामुळे सुरक्षिततेचे सर्व नियम पाळतो. उंचीबाबत हायकोर्टाचे नियम पाळण्यात येतात. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील गोविंदाची पथके सहभागी होतात. या उत्सवात दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात. गेल्या ३८ वर्षांपासून कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
- संजय खुळे, अध्यक्ष, इतवारी नवयुवक मंडळ.
दहीहंडी उत्सवात मध्य प्रदेश व छत्तीसगडचे गोविंदा पथक
पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपुरात दहीहंडीचा उत्सवाचा जोर दिसून येतो. संपूर्ण नागपुरात ३० पेक्षा जास्त मंडळ असले तरीही इतवारी, हिवरीनगर, संगम टॉकीज, नंदनवन, अयोध्यानगर, सहकारनगर या भागातील जुन्या मंडळाच्या उत्सवाचे स्वरूप व्यापक आहे. या ठिंकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी होते. एक-दोन वर्षांपासून या उत्सवाला कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. त्यामुळे स्पर्धा वाढते. यावर्षी नंदनवन भागातही उत्सवाचे स्वरूप मोठे राहणार आहे. इतवारीतील एकमेव गोपिकांच्या दहीहंडी उत्सवात जवळपास पाचे पथके असतात. याशिवाय मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील आणि तालुक्यातील युवकांची पथके येतात. पाच ते सात थराच्या पलीकडे ते जात नाहीत.
अशी आहे नियमावली
१८ वर्षांखालील गोविंदाचा सहभाग नसावा.
२० फुटापेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.
सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.
मानवी मनोऱ्यावर पाण्याचा मारा करू नये.
कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.
कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.
दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश डीजेचा वापर शक्यतो टाळावा.
आपात्कालीन व्यवस्था असावी.