पंचायत विभागाची वाढली डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:09 AM2021-03-25T04:09:34+5:302021-03-25T04:09:34+5:30
नागपूर : नागरी व जनसुविधेच्या कामाचे प्रस्ताव पंचायत विभागाच्या माध्यमातून ‘आयपास’ या सर्व्हरवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. परंतु ...
नागपूर : नागरी व जनसुविधेच्या कामाचे प्रस्ताव पंचायत विभागाच्या माध्यमातून ‘आयपास’ या सर्व्हरवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यासाठी बराच त्रास होत आहे. मार्च एन्डिंग असल्याने चार दिवसात हे काम कसे पूर्ण करायचे, असा प्रश्न पंचायत विभागाला पडला आहे.
जिल्हा नियोजन समितीचा ३० कोटींच्यावर निधी एकट्या जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला देण्यात आला़ हा निधी मंजूर होऊन तो वित्त विभागाच्या तिजोरीतही जमा झाला़ दोन्ही शीर्षातून गावेही फायनल करण्यात आली़ आता ‘आयपास’ या सर्व्हरवर हे सर्व प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करायचे आहे. हे प्रस्ताव वेळेत अपलोड न झाल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जाण्याची वेळ या विभागावर येण्याची दाट शक्यता आहे़ जवळपास नागरी सुविधांचे १७० आणि जनसुविधांचे ४०० प्रस्ताव आहेत. या योजनेतील गावे फायनल करण्यासाठीच बराच वेळ निघून गेला़ कामाची यादी अंतिम करताना पंचायत विभागाच्या नाकीनऊ आले होते. आता गावांच्या याद्या, प्रस्ताव लेखी स्वरूपात पूर्णत: तयार झाल्यानंतर ते जिल्हा नियोजन समितीच्या आयपास सर्व्हरवर अपलोड करण्याची मोठी जबाबदारी आहे़ हे सर्व प्रस्ताव चार दिवसात अर्थात ३१ मार्चपर्यंत अपलोड न झाल्यास समस्या उद्भवू शकते़ त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याची मागणी समोर येत आहे़