पूनर्मुल्यांकनात वाढले गुण, दहावीला भूषणने गाठली उच्च श्रेणी
By निशांत वानखेडे | Published: July 9, 2024 03:49 PM2024-07-09T15:49:24+5:302024-07-09T15:51:13+5:30
Nagpur : बाेर्डाच्या घाेळाने ताे आनंदाला मुकला
नागपूर : शिक्षण मंडळाच्या भाेंगळ कारभाराचा फटका अनेकदा विद्यार्थ्यांना साेसावे लागते. असाच अनुभव भूषण राजेश परमार या विद्यार्थ्यानेही घेतला. बाेर्डाने दिलेल्या निकालात ताे गुणवत्ता यादीत मागे पडला हाेता. मात्र पुनर्मुल्यांकनाच्या निकालात ७ गुण वाढून मिळाले, ज्यामुळे त्याने विभागात अव्वल श्रेणी गाठली.
भूषण हा तेजस्वीनी हायस्कूल, नंदनवन येथील विद्यार्थी आहे. शिक्षण मंडळातर्फे मार्च-२०२४ ला घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल २७ मे राेजी लावण्यात आला. या परीक्षेत भूषणला ५०० पैकी ४८५ गुण म्हणजे ९७ टक्के गुण मिळाले हाेते. मात्र या निकालाने भूषण समाधानी नव्हता. आपल्याला यापेक्षा अधिक गुण मिळतील, असा त्याला विश्वास हाेता. त्यामुळे त्याने १२ जूनला त्याने पुनर्मुल्यांकनासाठी बाेर्डाकडे अर्ज केला. नुकताच पुनर्मुल्यांकनाचा निकाल त्याच्या हाती आला तेव्हा त्याचा विश्वास खरा ठरला. भूषणचे विज्ञान-१ या विषयाचे ७ गुण वाढले व या वाढीव गुणासह त्याची टक्केवारी ९८.४० टक्क्यावर गेली.
प्रामाणिकपणे केलेला अभ्यास आणि साेडविलेली उत्तरे या भरवशावर त्याला उच्च श्रेणी गाठण्याचा विश्वास हाेता आणि पुनर्मुल्यांकनाच्या निकालाने ताे खराही ठरला. या टक्केवारीनुसार भूषणने दहावीच्या परीक्षेत नागपूर विभागातून अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. बाेर्डाच्या चुकीमुळे प्रत्यक्ष निकालाच्या वेळी हा आनंद साजरा करता आला नसला तरी फेरतपासणीतील गुणवाढीमुळे त्याचा विश्वास दुनावला आहे. पुढच्या सर्व परीक्षांमध्ये ही गुणवत्ता कायम ठेवण्याची भावना त्याने व्यक्त केली.