कोरोनामुळे आतड्यांमधील रक्तस्रावाच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 10:12 AM2021-06-16T10:12:34+5:302021-06-16T10:13:49+5:30
Nagpur News कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले असताना आता पोटाचे आजार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. विशेषत: पोटाच्या आतड्यामध्ये रक्तस्रावाची समस्या घेऊन रुग्ण येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले असताना आता पोटाचे आजार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. विशेषत: पोटाच्या आतड्यामध्ये रक्तस्रावाची समस्या घेऊन रुग्ण येत आहेत. याला वैद्यकीय भाषेत ‘जीआय ब्लीड’ म्हणतात. कोरोनाचा ५०० रुग्णांमध्ये दोन ते तीन रुग्ण या आजाराचे आढळून येत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नाही. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झालेल्यांमध्ये हा आजार दिसून येत आहे. त्याच धर्तीवर कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये आतड्यांचे आजारही दिसून येत असल्याचे पोटविकार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचे रुग्ण कमी असले तरी लक्षणे दिसताच डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
रक्त पातळ करण्याचे औषध न घेण्याऱ्यांमध्येही दिसतोय आजार
तज्ज्ञानुसार, कोरोनामुळे होणाऱ्या ‘जीआय ब्लीड’ या आजारामध्ये आतड्यांमधील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होऊन अल्सर तयार होतो. परिणामी, आहारनलिका, जठरमधून रक्तस्राव होतो. विशेष म्हणजे, रक्त पातळ करण्याचे औषध न घेणाऱ्या रुग्णांमध्येही ही लक्षणे दिसून येत आहेत.
पोट फुगणे, दुखणे, भूक न लागण्याच्या वाढल्या तक्रारी
कोरोना होऊ नये म्हणून अनेकांनी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात काढा व हर्बल औषधे घेतली आहेत. परिणामी, पोट फुगणे, पोट दुखणे, भूक न लागणे व पोट साफ न होणे आदी विकार वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-लठ्ठपणा व फॅटी लिव्हरच्या रुग्णांत वाढ
टीव्हीसमोर बसून खात राहिल्याच्या सवयीमुळे त्याचे परिणाम आरोग्यावर होत आहे. टीव्हीसमोर बसून खाताना टीव्हीवर काय सुरू आहे याकडेच अनेकांचे लक्ष असते, त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त अन्न त्यांच्या पोटात जाते. परिणामी, लठ्ठपणा व ‘फॅटी लिव्हर’चे आजार वाढल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-‘जीआय ब्लीड’चे रुग्ण दिसून येत आहे
कोरोनामुळे पोटाच्या आतड्यामधील रक्तस्राव, ‘जी आय ब्लीड’चे रुग्ण दिसून येत आहे. या शिवाय, अतिप्रमाणात काढा व तत्सम पदार्थांचे सेवन केल्याने पोटाचे विकार वाढले आहेत. पोटासंदर्भातील कुठल्याही लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. प्रकाश सोनकुसरे, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट
सूक्ष्म रक्तवाहिन्यात गुठळ्यामुळे रक्तस्राव
कोरोनांतर पोटातील आतड्यांमधील सूक्ष्म रक्तवाहिन्यात गुठळ्या तयार होऊन रक्तस्रावाची समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये टीव्ही समोर बसून खाण्याचा सवयीमुळे लठ्ठपणा व फॅटी लिव्हरचेही रुग्ण दिसून येत आहेत.
-डॉ. अमोल समर्थ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट